Aadhar Linkage Problem : 2 लाख विद्यार्थ्यांचे आधार आहेत मिसमॅच; जिल्ह्यातील स्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aadhar Linkage Problem

Aadhar Linkage Problem : 2 लाख विद्यार्थ्यांचे आधार आहेत मिसमॅच; जिल्ह्यातील स्थिती

येवला- नामपूर (जि. नाशिक) : राज्यातील शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झाल्याशिवाय शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठीची संचमान्यता होणार नसल्याने शिक्षक वर्ग चिंतेत आहेत.

जिल्ह्यातील सुमारे १३ लाख १६ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ८७ हजार ८१६ विद्यार्थी अद्यापही आधार अपडेट नसल्याने कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आधारकार्ड असूनही नाव, चुकीचे स्पेलिंग, लिंग, जन्मतारीख यात बदल असल्याने मिसमॅचची समस्या उभी राहिली आहे. जिल्ह्यातील सुमारे १८ हजाराहून अधिक विद्याथ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे उघडकीस आले आहे.

त्यामुळे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे मिसमॅच आधार तातडीने अपडेट करावे, असे आवाहन शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. (2 lakh students have Aadhaar mismatch Status of district nashik news)

राज्यात १ लाख १० हजार ३१५ शाळांमध्ये सुमारे २ कोटी २५ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्य शासनाच्या वतीने पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान, मोफत गणवेश, पाठय़पुस्तक व इतर आनुषंगिक योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो.

या योजनांचे लाभ गरजू व पात्र विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजेत, अशी शासनाची भूमिका आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी आणि पालक दोघांचेही आधारसक्ती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे पालकांना आधार कार्डबाबत अधिक दक्ष रहावे लागणार आहे.

मालेगावचे काम संथगतीने

शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत आदेश बजावूनही अनेक विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण झालेले नाही. दिंडोरी तालुक्याने ९४ टक्के काम पूर्ण करून जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला असून मालेगाव महानगर पालिका क्षेत्रात केवळ ६६ टक्केच काम झाल्याने अगदी तळाला आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या बोटांच्या ठशासह आधार नोंदणी करणे काही शाळांना, पालकांना शक्य झाले नाही. जिल्ह्यात आधार अपडेटचे ८५ टक्के काम झाले असून उर्वरित विद्यार्थ्यांचे तातडीने आधार दुरुस्ती करावी, असे आवाहन जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केले आहे.

शिक्षक पदे घटण्याची चिन्हे

राज्यातील सर्व माध्यमांच्या, व्यवस्थापनांच्या अधिपत्याखालील शाळांतील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक नोंदणीचे कामकाज तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची शाळेत नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करावा लागतो.

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची पदे निश्चित करण्याची संचमान्यता केली जाते. मात्र आता आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरच संचमान्यता केली जाणार आहे.

आधार क्रमांक नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण न केल्यास शिक्षकांच्या कमी होणाऱ्या पदांना शालेय व्यवस्थापन जबाबदार राहील, असे शिक्षण विभागाचे आदेश आहे. त्यामुळे आधार नोंदणीचे कामकाज तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.

अस्तित्वात नसलेल्यांची नोंदणी

लाभार्थी विद्यार्थ्यांची अचूक माहिती उपलब्ध नसेल तर, त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्याला आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या ‘सरल’ या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.

काही विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी झाली आहे, तर अस्तित्वात नसलेल्या काही विद्यार्थ्यांच्याही नोंदी झाल्याचे समोर आले आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आधार क्रमांक नोंदणी अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

तालुका- विद्यार्थी- आधार अद्ययावत नसलेले- टक्केवारी

- दिंडोरी ७१२९९ ४५८० ९३.५३ टक्के

- पेठ २७७८७ १९१९ ९३.०५

- इगतपुरी ५१९३४ ४२१० ९१.८१

- नाशिक ५९९५७ ५५३६ ९०.६५

- चांदवड ४६२१७ ४३९३ ९०.४६

* कळवण ४३४५६ ४२१८ ९०.१४

* बागलाण ८१८५२ ८५६० ८९.४७

* त्रंबकेश्वर ३९५९५ ४२४६ ८९.१३

* सिन्नर ७०६७० ७७५१ ८८.८९

* निफाड ९९२७७ ११२७१ ८८.५९

* नाशिक युआरसी १ १६०५१५ १९११२ ८७.९५

* नाशिक युआरसी २ १४१८०२ १७२७३ ८७.६६

* येवला ५८४०३ ७६२८ ८७.७७

* नांदगाव ६०३७४ ९११८ ८४.७६

* देवळा ३३२०६ ५१०२ ८३.९२

* सुरगाणा ३८९४२ ७२३४ ८१.१६

* मालेगाव ९२३५० १९६५९ ७८.४०

* मालेगाव महापालिका १३९३९९ ४६००६ ६५.५९

टॅग्स :Nashikstudentadhar card