esakal | पिंपळगावला आढळला दोनशे वर्षांपूर्वीचा घाट
sakal

बोलून बातमी शोधा

ghat

पिंपळगावला आढळला दोनशे वर्षांपूर्वीचा घाट

sakal_logo
By
दिपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : प्रत्येक गावात प्राचीन काळाची ओळख देणाऱ्या वास्तू आढळतात. पण काळाच्या ओघात, ग्रामविकासात किंवा दुर्लक्षित झाल्याने त्या भूमिगत होतात, असाच ऐतिहासिक ठेवा पिंपळगावच्या पाराशरी नदीतीरी असल्याची माहिती श्रीराम मित्रमंडळाला मिळाली अन्‌ तरुणांनी खोदकाम हाती घेतले. तब्बल दोनशे वर्षांपूर्वीचे पाच घाट व बुरूज उत्खननातून मिळाले आहेत. काळ्या पाषाणातील हे घाट बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. (200 years old ghat found in pimpalgaon baswant nashik news)


श्रीराम मंदिरालगत पाराशरी नदी आहे. सध्या ती कोरडी आहे. बापूसाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून येथील श्रीराम मंडळाने हनुमान मंदिराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. मंडळातील सहकाऱ्यांना वसंतराव आंबेकर यांनी पाराशरी नदीकाठी पुरातन घाट असल्याची माहिती दिली. पुराच्या पाणी व मातीने भूमिगत झालेले घाट व बुरूज उकरण्याचा संकल्प तरुणांनी केला. आठ दिवसांच्या परिश्रमानंतर काळ्या पाषाणातील पाच दगडी घाट उत्खननातून मोकळे करण्यात आले. ते इतके भक्कम आहेत, की दीड वर्षात पारशरीला अनेकदा महापूर येऊनही ते ढासळलेले नाहीत. हा ऐतिहासिक ठेवा बघण्यासाठी नागरिकांची राममंदिर परिसरात गर्दी होत आहे. ‘मविप्र’चे माजी संचालक दिलीप मोरे, विश्‍वास मोरे, रवींद्र मोरे आदींनी या घाटाची पाहणी केली. दरम्यान, पाराशी नदीत महादेवाचे मंदिर असल्याचे पिंपळगावचे माजी सरपंच (कै.) टी. टी. मोरे यांनी सांगितले होते. उत्खननात महादेवाची पिंडी मिळाल्याने त्या दाव्याला बळकटी मिळाली आहे.

हेही वाचा: पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट


पारशरी तीराचे सुशोभीकरण

संथ वाहणारी पाराशरी, विविध प्रकारची झाडे अन्‌ पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे श्रीराम व हनुमान मंदिर परिसराचे वातावरण प्रसन्न असते. श्रीराम मंडळाने पिंपळगावच्या सौंदर्यात अजून भर टाकण्यासाठी लोकवर्गणीतून परिसर सुशोभीकरण हाती घेतले आहे. हनुमान मंदिराला संरक्षण भिंत, वृक्षारोपण, रंगरंगोटी, रोषणाई यांसह जॉगिंग ट्रॅक अशी कामे सुरू आहेत. पुरातन घाट व सुशोभीकरणाने हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणार आहे.
श्रीराम मंडळाचे बापूसाहेब पाटील, रवींद्र तिडके, श्याम जाधव, प्रभाकर विधाते, रामदास विधाते, गणेश घुमरे, ज्ञानेश्‍वर खैरनार, अनिल महाले, हृषीकेश शिंदे, सुरेश जोशी यांनी पुरातन घाट उत्खननासाठी श्रमदान केले.

ज्येष्ठ नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर उत्खनन सुरू केले. पाच घाट मिळाले असून, दोन वर्षांनंतरही ते भक्कम आहेत. या परिसराचे लोकवर्गणीतून सुशोभीकरण सुरू आहे. लवकरच हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल.
- बापूसाहेब पाटील, अध्यक्ष, श्रीराम मित्रमंडळ

(200 years old ghat found in pimpalgaon baswant nashik news)

हेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

loading image