भाऊ काही नाही, थर्टीफस्‍ट आहे..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

31st december party

भाऊ काही नाही, थर्टीफस्‍ट आहे..!

सरत्‍या वर्षाला निरोप देताना थर्टीफस्‍टचा मोठा जल्‍लोष सगळीकडे बघायला मिळाला. पण हा दिवस म्‍हटला, की तळीरामांना विशेष पर्वणी असते. सायंकाळी झिंगतांना तळीरामांचे दृष्य अगदी हमखास बघायला मिळतेच. पण एखाद्या सामान्‍यावरही विनाकारण मद्यपी असल्‍याचा शिक्‍कादेखील बसू शकतो, हे एका विनोदी घटनेतून समोर आले. काल सायंकाळपासून शहरात थर्टीफस्‍टच्‍या जल्‍लोषाचे वातावरण बघायला मिळत होते.

युवकांमधला उत्‍साह तर विचारायलाच नको. असेच थर्टीफस्‍टच्‍या पार्टीचा बेत आखलेला युवकांचा समूह गंगापूर रोडपरिसरातील चौकात एका मित्राची वाट बघत उभे होते. शेजारीच दुकान असल्‍याने ग्राहकांची वर्दळ सुरु होती. इतक्‍यातच मोटारसायकलवर दोघे युवक तेथे किराणा साहित्‍य घेण्यासाठी दाखल झाले. गाडीचा स्‍टॅण्ड लावायचा विसर पडल्‍याने गाडीवरुन उतरताना दुचाकीस्‍वाराचा तोल गेला.

अगदी क्षणार्धात सारे काही घडल्‍याने युवकांच्‍या समुहापैकी काहींनी धाव घेत पडणाऱ्या दुचाकीस्‍वाराला सावरले. अन्‌ एक युवक म्‍हणाला, 'भाऊ काही विषय नाही, थर्टीफस्‍ट आहे, होत असते.’ काही क्षणांपर्यंत दुचाकीवरील युवकाला काहीही समजले नाही. पण हे युवक आपल्‍याला मद्यपी समजत असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर युवक चांगलाच कानपटला. मान खाली घालत वस्‍तू घेऊन तो मिनिटाभरात तेथून पसार झाला. (31st party naroshankarahi ghanta nashik news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Jindal Fire Accident : अन्‌ पोलिस, सिव्हिल यंत्रणा झाली सज्ज

घरच्यांना बोलव...मग पाहू बहीण की...

स्थळ : नाशिकमधील मुंबई नाका परिसर. वेळ : सरत्या वर्षाची रात्र. ‘ओ साहेब... ती खरंच माझी बहीण आहे हो !' ही आर्जव चालली होती. ‘न्यू एअर सेलीब्रेशन'साठी तरुणाईची मोटारसायकलवरुन सैर चालली होती.

त्याचवेळी तळीरामांना चाप लावण्यासाठी खाकी वर्दी सज्ज होती. पोलिस दादांकडून तपासणी सुरु असताना समोरून भरधाव वेगात तरुण आणि तरुणाई चालल्याचे त्यांच्या नजरेतून सुटली नाही. पोलिसांनी दोघांना हटकलं अन थांबवलं. गारठ सुटलेले असतानाचा ‘वेस्टर्न स्टाइल'चा पेहराव पाहून पोलिसांना शंका आली.

त्याचक्षणी एकाने तुम्ही कोण आहात? अशी विचारणा केली. तेवढ्यात तरुणाने ‘साहेब, ही माझी बहीण आहे', असं सांगताच, पोलिसांनी फर्मान सोडलं, ‘बोलव तुझ्या आई-बाबांना !' इतक्या रात्री तुम्हाला आई-बाबा आल्याशिवाय सोडणार नाही, असा पवित्रा घेताच दोघांची भंबेरी उडाली. तुम्ही रात्री एकत्र फिरताहेत हे तुमच्या घरच्यांना माहिती व्हायला हवंच, असं पोलिसांनी दरडावताच, तरुणाची विनवणी सुरु झाली, ‘ओ साहेब, पप्पांना कशाला बोलवायचं, ती खरंच माझी बहीण आहे हो !'...इतकं सारं पाहिल्यात ‘त' म्हटल्यावर तपेलं ओळखणार नाहीत तर ते कसले पोलिस म्हणा.

शेवटी घरच्यांना बोलव, मग पाहू बहीण आहे की कोण? असं पोलिसांनी म्हणताच, दोघांच्या चेहऱ्यावरील उत्साह मावळला होता. पोलिसांनी समज देऊन दोघांना सोडून दिले खरं. पण बिंग फुटल्याच्या भावनेने ओशाळलेल्या चेहऱ्यांनी दोघे दुचाकीवरून भुर्रकन निघून गेले.

हेही वाचा: Nashik Fire : कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आदेश

टॅग्स :NashikHappy New Year