esakal | जिल्ह्यात कोरोना कहर थांबेना! दिवसभरात उच्चांकी 41 बाधितांचा मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबेना! दिवसभरात उच्चांकी 41 बाधितांचा मृत्‍यू

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंच्‍या संख्येतही वाढ होते आहे. शुक्रवारी (ता.16) जिल्‍ह्‍यात कोरोनाने 41 जणांचा बळी घेतला असून एका दिवसांत कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंची ही उच्चांकी संख्या आहे. मृतांमध्ये सर्वाधिक 26 हे नाशिक ग्रामीण भागातील आहेत. दरम्‍यान जिल्‍ह्‍यात चार हजार 435 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत.

जिल्‍ह्‍यात कोरोना बळींची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत आहे. शुक्रवारी झालेल्‍या 41 मृत्‍यूंपैकी नाशिक ग्रामीणमधील सव्वीस मृतांचा समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक सहा बळी निफाड तालुक्‍यातील असून, बागलाण आणि कळवण तालुक्‍यातील प्रत्‍येकी पाच, मालेगाव ग्रामीणमधील दोन, चांदवड, पेठ, देवळा, नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी एक तर दिंडोरी तालुक्‍यातील दोन बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. नाशिक महापालिका क्षेत्राला लागून असलेल्‍या नाशिक तालुका हद्दीतील मांडसांगवी येथील एकासह विल्‍लोळी येथील एकाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील नऊ, मालेगाव महापालिका क्षेत्रातील चार तर जिल्‍हा बाहेरील दोघांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला.

दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 403, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 832, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दीडशे तर जिल्‍हा बाहेरील पन्नास रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. दिवसभरात चार हजार 596 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. आढळलेल्‍या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या किरकोळ प्रमाणात कमी झाली आहे.

हेही वाचा: नातेवाइकांचा आक्रोश अन्‌ हुंदके पावलोपावली! अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

युवक ठरतायत शिकार

कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूंमध्ये युवकांची संख्या वाढत चालली आहे. शुक्रवारी चाळीशीच्‍या आतील सहा जणांचा मृत्‍यू झाला आहे. यात कौळाणे (ता.मालेगाव) येथील 30 वर्षीय, पिंपळखेड (नांदगाव) येथील 33 वर्षीय महिलेसह विल्‍होळीतील 26 वर्षीय युवती, पेठ तालुक्‍यातील 30 वर्षीय, सातपूर परीसरातील 30 वर्षीय आणि मुळचा धुळ्यातील व नाशिकला उपचार घेत असलेल्‍या 26 वर्षीय युवकाचाही कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे.

7 हजार 924 प्रलंबित अहवाल, संशयितांची संख्या लक्षणीय

सायंकाळी उशीरापर्यंत सात हजार 924 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील चार हजार 942, नाशिक महापालिका क्षेत्रातील दोन हजार 602, मालेगावच्‍या 380 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चार हजार 777 संशयित दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रात चार हजार 370 रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 37 रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये 292, मालेगावला 73 रुग्‍ण दाखल झाले.

हेही वाचा: लग्नाचा बार उडवणे भोवले! यजमान, वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची लागण

शहराचे आरोग्य धोक्यात

स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली जाते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून, तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी होत आहे.