esakal | नाशिक : खासगीमधून ४८१ विद्यार्थ्यांचा पालिकेच्या शाळेत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा

नाशिक : खासगीमधून ४८१ विद्यार्थ्यांचा पालिकेच्या शाळेत प्रवेश

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे रोजगार हिरावल्याने आर्थिक परिस्थिती खालावलेल्या पालकांनी महापालिकेच्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. शहरामध्ये ४८१ खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून पालिकेच्या शाळेत प्रवेश झाल्याची बाब शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थी टिकविण्याची जबाबदारी वाढली आहे.शहरात महापालिकेच्या ८८ प्राथमिक शाळा आहेत. त्या शाळेत २२ हजार ४७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहे, तर तेरा माध्यमिक शाळांमध्ये ३, ५५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडू नये, यासाठी महापालिकेच्या शिक्षकांनीदेखील ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देता आले नाही. पंधरा हजार १४३ विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था झाली. आठ हजार ८३८ विद्यार्थ्यांकडे सुविधा नसल्याने पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून शिक्षण दिले गेले, तर दोन हजार ४९ विद्यार्थ्यांशी संपर्क होत नसल्याने ते विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले गेल्याचा निष्कर्ष अहवालातून निघाला होता. परंतु, महापालिका शाळांमध्ये खासगी शाळांमधून प्रवेश घेणाऱ्यांची संख्यादेखील यावर्षात वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

हेही वाचा: नाशिक : कांद्यांची आवक घटूनही बाजार भाव घसरलेलेच


रोजगार बुडाल्याचा परिणाम

ऑनलाइन शिक्षण असतानाही खासगी शाळांकडून फी वसूल केली जात आहे. परंतु, कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने अनेकांना फी भरणे परवडत नाही. फी अदा न केल्यास ऑनलाइन शिक्षण बंद केले जात असून, विविध कारणे देवून पालक व विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. त्यामुळे पाल्यांना खासगी शाळांमधून महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जात आहे. यावर्षात ४८१ खासगी इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी महापालिकेच्या शाळेमध्ये दाखल झाले आहेत. खासगी शाळेमध्ये फी सोबतच अन्य कारणांसाठी शुल्क अदा करावे लागतात, परंतु मनपाच्या शाळेत शिक्षणासह साहित्यदेखील मोफत मिळत असल्याने महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी दाखल केले जात आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात ४८१ खासगी शाळांमधील विद्यार्थी दाखल झाले आहेत. शैक्षणिक शुल्क परवडत नसल्याचे कारण प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे.
- सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

loading image
go to top