Bank Holiday During Diwali : सणासुदीच्या धामधुमीत बँकांना टाळे! | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank Holiday During Diwali

Bank Holiday During Diwali : सणासुदीच्या धामधुमीत बँकांना टाळे!

नाशिक : शनिवार (ता. २२) पासून दिवाळीची धामधूम सुरू झाली असताना बँकांना सलग पाच दिवस सुटी आहे. पण या धामधुमीत काही राष्ट्रीयकृत बँकांसह त्यांचे एटीएम केंद्रही बंद असल्याने पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठीच गैरसोय झाली. दिवाळी असल्याने शनिवारपासून सलग पाच दिवस राष्ट्रीयकृत बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे आर्थिक कामकाज बंद पडणार असल्यामुळे नागरिकांना आजपासूनच पैशासाठी कुलूप बंद बँकाचे दर्शन घडले. (5 days national holiday to banks during diwali 2022 nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Diwali 2022 : आनंद द्विगुणित करण्यासाठी घ्या खबरदारी; MSEDCLचे आवाहन

नाशिक रोडला प्रेस कामगारांसह अनेक केंद्रीय व राज्य सरकारी बँकांच्या पेन्शनरांचे खाते असलेल्या कॅनरा बँकेच्या बिटको चौकातील शाखेसह तेथील एटीएम केंद्रही बंद होते. परिणामी दिवसभर अनेक पेन्शनरांची परवड झाली. शहर जिल्ह्यात दिवसाला साधारण दीडशे ते दोनशे कोटीच्या आसपास आर्थिक उलाढाल होत असते. बँकांचे बरेच कामकाज ऑनलाइन झाले असले तरी दिवाळीसारख्या सण उत्सवात नागरिकांना हातखर्च, किरकोळ व्यवहारासाठी रोख रकमेची गरज असते.

दिवाळीला अनेकांचा घरगुती लक्ष्मी पूजेसाठी कोऱ्या नोटांचा आग्रह असतो. त्यामुळे चार- पाच दिवस आधीपासून बाजारात बँकेत कोऱ्या करकरीत नोटांच्या बंडलांची मागणी वाढते. सुटीत दिवाळी खरेदीचे नियोजन असलेल्या नागरिकांना किरकोळ खरेदीसाठी दिवाळी पूजा साहित्यासह दैनंदिन कामकाजाला रोख रकमेची गरज असते. मात्र, शनिवारी पहिल्या दिवशी काही बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाल्याने तारांबळ उडाली.

"राष्ट्रीयकृत बँकांना सलग पाच दिवसांच्या सुटी आल्या आहेत. पेन्शनरांसह व्यावसायिकांच्या आर्थिक गरजेपोटी शनिवारी जेव्हा लोक बँकांत गेले तेव्हा पहिल्याच दिवशी एटीएम केंद्राला टाळे पाहून अनेकांना मनस्ताप झाला." - मधुकर नवघणे, व्यावसायिक व निवृत्त प्रेस कामगार

हेही वाचा: Diwali Padwa 2022 : दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!

टॅग्स :Diwali FestivalBankNashik