Nashik Crime News: शांत शहराला गुन्हेगारीचे गालबोट; गेल्या 10 दिवसात 6 प्राणघातक हल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News: शांत शहराला गुन्हेगारीचे गालबोट; गेल्या 10 दिवसात 6 प्राणघातक हल्ले

नाशिक : पंचवटीतील फुलेनगरमधील गोळीबाराच्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच, रविवारी (ता. १९) भरदिवसा रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली. तर गेल्या दहा दिवसांमध्ये प्राणघातक हल्ल्याच्या ६ तर २० दिवसांमध्ये ९ आणि गेल्या अडीच महिन्यात २० घटना घडलेल्या आहेत.

यामुळे शहरात नेमके कायद्याचे राज्य आहे की, गुन्हेगारांची मोगलाई सुरू आहे, असा प्रश्‍न दहशतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नाशिककरांना पडला आहे.

राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नाशिकची ओळख निसर्गरम्य जशी आहे तशीच शांत शहर म्हणूनही आहे. मात्र, नवीन वर्षामध्ये शांत असलेल्या नाशिक शहराला गुन्हेगारीच गालबोट लागले आहे. गेल्या जानेवारीपासून ते २० मार्चपर्यंत अडीच महिन्यात नाशिक शहरात सातत्याने गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे चित्र आहे.

खून, प्राणघातक हल्ले, हाणामाऱ्या, चोऱ्या- घरफोड्या या घटना सातत्याने सुरूच आहेत. विशेषत: गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये काही घटना वगळता कोयत्याचा सर्रास वापर करण्यात आलेला आहे. तसेच, गेल्या आठवडाभरात तर दोन गुन्ह्यात गावठी कट्ट्यांचा वापर केल्याने शहरात ही हत्यारे आलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

गेल्या अडीच महिन्यांमध्ये नाशिक शहरात प्राणघातक हल्ल्याच्या २० घटना घडलेल्या आहेत. तर, गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल ९ घटना घडल्या आहेत. यातील दोन गुन्ह्यांमध्ये गोळीबार झाल्याच्या घटना आहेत. १२ मार्चला पंचवटी फुलेनगरमध्ये वर्चस्ववादातून एका गटाने गोळीबार केला. यात एक महिला आणि पाळीव कुत्रा जखमी झाला होता.

याप्रकरणातील संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना आठ दिवस लागले. तर, सातपूरच्या घटनेत भरदिवसा दोघांवर पिस्तुलातून फैरी झाडल्या. मुंबई नाक्याच्या हद्दीतील बजरंगवाडीतही वर्चस्वाच्या वादातून दोन गटात राडा झाला होता.

याच महिन्यात सातपूरला जमिनीच्या वादातून, देवळाली कॅम्पला धुळवडीच्या दिवशी वैमनस्यातून, इंदिरानगरला जुन्या वादातून कोयत्याचा वापर करून वार करीत प्राणघातक हल्ले करण्यात आले तर, उपनगर हद्दीत वडनेर रोडवर पूर्ववैमनस्यातून एकाच्या अंगावर चारचाकी वाहनच घालण्याचा प्रयत्न झाला.

या साऱ्या घटनांमध्ये शहरातील गुन्हेगारी बोकाळल्याचे चित्र असून, पोलिस मात्र गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे आव आणत आहेत. परंतु, पोलिसांच्या या भूमिकेमुळे शहराची कायदा व सुव्यवस्थाच धोक्यात आले असून, नाशिककर दहशतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र आहे.

उद्योजकाचा मृत्यूचे उकलेना गूढ

१६ मार्चला अंबड पोलिस ठाण्यात दाखल उद्योजक कौशिक यांच्या मृत्युप्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल असला तरी, त्यांच्या शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू शरीरांतर्गत दुखापतींनी झाल्याचे समजते. त्यामुळे प्रारंभी हायपर टेन्शनमुळे त्यांचा मृत्यू झाल्याने अकस्मात दाखल नोंद आहे.

परंतु या घटनेला उलटून पाच दिवस झाले तरी याप्रकरणी अंबड पोलिसांकडून गुन्ह्याची उकल होऊ शकलेली नाही. त्याचप्रमाणे, सातपूर गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांवर चहूबाजूने टीका होऊ लागल्याने पंचवटीतील गोळीबार प्रकरणातही संशयितांना सोमवारी (ता. २०) अटक केल्याचे पोलिसांनी जाहीर केले.

आकडेवारी बोलते

- खून (२०२३) : १३

- प्राणघातक हल्ले (२०२३) : २०

टॅग्स :NashikCrime News