
नैताळेच्या मधुकर कोल्हेंनी लिहिली ८०० पानी ज्ञानेश्वरी
निफाड (जि. नाशिक) : ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) ग्रंथाचे पारायण आपण ऐकले आहे. मात्र, संपूर्ण ज्ञानेश्वरीच हस्तलिखित (Hand written) करण्याची किमया नैताळे येथील अक्षरमित्र मधुकर कोल्हे या अवलिया शेतकरी पुत्राने केली आहे. (800 page Dnyaneshwari written by Madhukar Kolhe of Naitale Nashik News)
संस्कृत भाषा आणि त्यातील ग्रंथ हस्तलिखित करणे एवढे सोपे नक्कीच नाही. ज्ञानेश्वरी काही सामान्य ग्रंथ नाही. प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचे तेज या ग्रंथात आहे. ग्रंथ लिहिण्यासाठी अक्षरांशी एकरूप व्हावे लागते. यात काना, मात्रा, वेलांटी, उकार यात काही चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मात्र, हे अवघड शिवधनुष्य कोल्हे यांनी पेलले आहे. कोल्हे यांनी ज्ञानेश्वरीचे संपूर्ण १८ अध्यायातील गीतेचे ७०० श्लोक व तब्बल ९००३३ ओव्या, पसायदान हस्तलिखित केले आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या वहीचे ८०० पाने लागली. २००३ ला कोल्हे यांना पहिल्यांदा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करण्याचा योग आला. त्यानंतर कोल्हे यांना ज्ञानेश्वरी वाचनाची आवड निर्माण झाली.
घरी कधी १०, कधी २० तर कधी ५० ते १०० ओव्यांचे ते पठण करत. त्यांना बऱ्याच शब्दांचे अर्थ समजत नव्हते. मग त्यांनी सार्थ ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणला आणि त्यातून शुद्ध मराठीत केलेला अनुवाद समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना संस्कृतमधील श्लोक वाचता येत नव्हते. २०१६ मध्ये नैताळेतील अखंड हरिनाम साप्ताहात प्रथमच त्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले. चार-दोन वेळेस पारायण केल्यानंतर उच्चार कळायला लागले. नंतर कोल्हे यांच्या मनात ज्ञानेश्वरी ग्रंथ लिखाण करण्याचा विचार आला किंवा तशी प्रेरणा माउलींनी दिली. २०२० अक्षय तृतीया या शुभ दिवशी त्यांनी ज्ञानेश्वरी लिखाणास आरंभ केला.
हेही वाचा: विभागात टंचाईच्या तीव्र झळा; राज्यात गेल्या वर्षीपेक्षा 147 टँकर अधिक
शेती व्यवसाय असल्यामुळे लिहायची सवय नव्हती. सुरवातीला अक्षर चांगले येत नव्हते. हळूहळू अक्षरात सुधारणा झाली. लेखनासाठी वेळ मिळत नव्हता. दिवसभर शेतीकामे करायची व सायंकाळी शुचिर्भूत होऊन लिहायला बसायचे. कधी १०, कधी ३०, तर कधी ५० ओव्या रोज लिहायला सुरवात केली. प्रथमदर्शनी हे काम सोपे वाटत असले, तरी प्रत्यक्षात यातील किचकटपणा ग्रंथ पाहताना लक्षात येतो. या ग्रंथात मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत एकही अक्षर मुद्रित नाही. ज्ञानेश्वरीच्या मुखपृष्ठावर हस्तलिखित ज्ञानेश्वर माउली यांचे चित्र, आतील पानात सुरवातीला प्रस्तावना, संपूर्ण ओव्या व शेवटी पसायदान, अशी रचना आहे. हस्तलिखित ग्रंथातील लेखन संपूर्ण ओळी खाली लिहिले आहे. ग्रंथावरून नजर फिरवली असता, अक्षर अत्यंत सुंदर व मोत्यासारखे काढले आहे. अखेर अत्यंत परिश्रम घेऊन कोल्हे यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिण्यात यश मिळविले व १० एप्रिलला ग्रंथ लिहून पूर्ण केला.
हेही वाचा: नाशिक : पोलिस अकादमीत येत्या शुक्रवारी दीक्षान्त सोहळा
Web Title: 800 Page Dnyaneshwari Written By Madhukar Kolhe Of Naitale Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..