esakal | दिंडोरीतून ८०७ टन द्राक्षांची निर्यात! यंदाचा हंगाम ठरला शेतकऱ्यांना फलदायी

बोलून बातमी शोधा

Export of grapes
दिंडोरीतून ८०७ टन द्राक्षांची निर्यात! यंदाचा हंगाम ठरला शेतकऱ्यांना फलदायी
sakal_logo
By
रामदास कदम

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातून आतापर्यंत सुमारे ८०७ टन द्राक्षांची परदेशात निर्यात झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असला तरी शेतकऱ्यांनी न डगमगता आपली कामे सुरूच ठेवल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांना फलदायी ठरला आहे.

कंटेनरद्वारे इतर देशांमध्ये द्राक्ष निर्यात

दिंडोरी आदिवासी तालुका, पश्‍चिम भाग डोंगराळ, नद्या व धरणांनी वेढलेला असला तरी आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. अनेक ठिकाणी डोंगराळ आणि लाल माती, तर पूर्व भागातील काळ्या मातीवर दर्जेदार द्राक्षे उत्पादित होत असल्याने शेतकऱ्यांचा कल द्राक्ष पिकांकडे असतो. सोनजांब, पालखेड बंधारा, राजापूर, जोपूळ, खेडगाव, तीसगाव, मोहाडी, जानोरी, आंबे, शिवनई, गणेशगाव, चिंचखेड, कोऱ्हाटे तसेच, पश्‍चिम पट्ट्यातील जांबुटके, लखमापूर, करंजवण, पिंप्रीअंचला, वणी खुर्द या गावांत द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात आहेत. येथून रशिया, युरोप, मलेशियासह अनेक देशांमध्ये द्राक्ष निर्यात केली जाते. पालखेड बंधारा, मोहाडी, जानोरी, खेडगाव, तिसगाव, वलखेड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पॉलिहाउस असल्याने निर्यातदार व्यापारी व शेतकऱ्यांनी ग्रुप तयार करून कंटेनरद्वारे इतर देशांमध्ये द्राक्ष निर्यात केली आहेत.

कंपन्यांनी घेतला पुढाकार

द्राक्षांची निर्यात वाढावी, शेतकऱ्यांचं हित जोपासावे या हेतूने महिको, महिंद्र महाग्रेप, रिलायन्ससह अनेक कंपन्यांनी द्राक्ष निर्यातीत उतरून पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी

मजुरांची समस्या...

द्राक्षबागांची जोपासना, छाटणी, फवारणी, काढणी अशा कामांसाठी मजुरांची कमतरता आहे. अनेक शेतकरी इच्छा असूनही द्राक्षबागांची लागवड करणे टाळत आहेत. यातच खोडकीड, लाल कोळी, मिलीबग यांचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. सुरवातीपासून शेवटपर्यंत पैसे हातात मिळेपर्यंत कायम भीतीचे वातावरण असते.

''यावर्षी उत्पादन कमी झाले. परंतु, सुरवातीच्या काळात दर जेमतेम होता. एप्रिलमध्ये दरात काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले. शेवटच्या टप्प्यात तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलो दराने लोकल द्राक्षाची विक्री झाली. तर निर्यातक्षम द्राक्षांची पन्नास ते सत्तर रुपये प्रतिकिलो दराने खरेदी झाली.''

- दिलीप गायकवाड, शेतकरी, पालखेड बंधारा

हेही वाचा: कोरोनावर ‘गूळवेल’ ठरतेय अमृत! गुणकारी फायद्यांमुळे मोठी मागणी