esakal | प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात! मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा

बोलून बातमी शोधा

Namdev Shinde
प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात! मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा
sakal_logo
By
अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : पाचवेळा हृदयविकाराचा झटका, खुब्याची झालेली शस्त्रक्रिया, रक्तदाब, मधुमेह आणि वय वर्षे ९२... तरीही आत्मविश्‍वास इतका दृढ की कोरोनावर यशस्वी मात करत मनमाडच्या नामदेव शिंदे यांनी पॉझिटिव्ह संदेश दिला. आपल्याला वेगवेगळे आजार असतांनाही केवळ इच्छाशक्ती व सकारात्मक विचारांच्या बळावरच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सध्या सर्वत्र कोरोनाने बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा बिकट काळातही एक आत्मविश्‍वासाचा किरण उभा केला आहे मनमाडच्या हुडको येथील ९२ वर्षीय नामदेव किसन शिंदे या ज्येष्ठ नागरिकाने. ३२ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९० साली रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले श्री. शिंदे पेन्शनर आहेत. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांना अशक्तपणा, ताप, सर्दी, खोकला, कफ अशी प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी डॉ. प्रवीण शिंगी यांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी केली. दुर्देवाने त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी स्कोअरही १३ होता. मात्र, ते डगमगले नाहीत. न घाबरता योग्य उपचारासाठी ते तयार झाले. परिस्थिती खालावल्यामुळे नांदगाव येथील डिसीएचसी कोविड सेंटरमध्ये डॉ. रोहन बोरसे यांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांनी धिर ठेवत एकट्याने उपचार करून घेत औषधे घेतली व कोरोनाला पळवून लावले. डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

आपल्याला अनेक असूनही केवळ प्रबळ इच्छाशक्ती, कुटुंबियांची मोलाची साथ मिळाल्यानेच आपण कोरोनावर यशस्वी मात केली. घाबरून न जाता सकारात्मक विचार ठेवले व योग्यवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधे घेत दक्षता घेतली. न घाबरता कोरोनाचे नियम पाळा, मास्कचा नियमित वापर करा, कोरोना नक्की बरा होईल.

- नामदेव शिंदे, कोरोनायोद्धा, मनमाड

हेही वाचा: गाजरवाडीची कृषिकन्या गाजवणार युद्धभूमी! बनली तालुक्यातील पहिली महिला फौजी