Aditya Thackeray | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आदित्य ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray in Nashik

Aditya Thackeray | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आदित्य ठाकरे

सिन्नर (जि. नाशिक) : यंदा संपूर्ण राज्यभर पावसाने सरासरी ओलांडली आहे. दिवाळीचे गोडाधोडाचे दोन घास देखील शेतकऱ्याच्या घशाखाली जायला तयार नाहीत. अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात असून सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे. मात्र, सरकारकडून याबाबतीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे चित्र असल्याचा आरोप शिवसेनेचे युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. (Aditya Thackeray Statement about Rainy drought Nashik News)

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सचिन आहीर यांच्यासमवेत श्री.ठाकरे यांनी सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उदय सांगळे, भारत कोकाटे, दीपक खुळे, निलेश केदार, अरुण वाघ यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे बघायला सत्ताधाऱ्यांकडे वेळ नाही.

अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून दिलासा देण्याची गरज आहे. सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असेल तर विरोधक म्हणून आम्ही देखील सरकारच्या सोबत राहू. मात्र, खोके बहाद्दरांकडून शेतकऱ्यांना मदत मिळेल ही अपेक्षा नाही असा टोला श्री ठाकरे यांनी लगावला. राज्यात सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचे काम सरकारकडून होत आहे. जगाचा पोशिंदा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याचे होणारे नुकसान भरून निघणार नाही.

मात्र सरकारकडून दिलासा देणारे शब्दही ऐकायला मिळत नाही ही शोकांतिका असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सरकारकडून केवळ मदतीची घोषणा झाली. शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले हे सर्वजण जाणून आहेत. शेतकऱ्याची समस्या जाणून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष बांधावर जाण्याची गरज आहे. मात्र राज्याला लाभलेले कृषिमंत्री शेतकऱ्यांची अवहेलना. करतात मुख्यमंत्री नेमकं कोण हे देखील समजत नाही. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुढे आली आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नसल्याची खंत श्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Nashik : भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या मावशी अन् भाचीचा दुर्देवी मृत्यू

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. यातून खातेवाटप होणार, मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप होणार. पण शेतकरी व कष्टकरी जनतेच्या समस्यांच्या सोडवणुकीचे काय ? खोके घेऊन सत्ताधारी सारे काही आलबेल असल्याचे सांगताहेत. दिवाळीला रेशनवर कीट वितरित केले ते सर्वांपर्यंत पोहोचले का? हे कीट देण्यासाठी छापलेल्या पिशव्यांवर पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. ते छापण्याची गरज होती काय. हे कीट पुरवठ्याचे टेंडर घाईघाईने काढण्यात आले. त्यात मोठा घोटाळा दडला असल्याचा आरोप श्री. ठाकरे यांनी केला.

समृद्धीचे काम दर्जाहीन....

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम दर्जाहीन झाले आहे. या कामात कोणाकोणाचे खिशे गरम झाले ते नाव घेऊन सांगण्याची गरज नाही ज्यांच्याकडे सुरुवातीपासून समृद्धीचे काम होते तेच आता मुख्यमंत्री बनलेत. आमची चूक झाली आम्ही त्यावेळी समृद्धीच्या कामाकडे लक्ष दिले नाही. ठेकेदार शेतकऱ्यांवर बंदूक रोखून अरेरावी करतो.

या बंदुकांना परवाना आहे काय हे पोलिसांनी तपासावे. समृद्धीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या त्यांना त्यांच्या शेतामध्ये जायला रस्ते नाहीत. समृद्धी लगतच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले त्याबाबत सरकारला देणेघेणे नाही.

हेही वाचा: Nashik Crime News : ऐन दिवाळीच्या दिवशी चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली 4 दुकाने