Nashik News : CCTV फुटेज व्हायरल झाल्यानंतर गोळीबार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

Nashik News : CCTV फुटेज व्हायरल झाल्यानंतर गोळीबार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

नाशिक : पेठ रोडवरील फुलेनगरमध्ये मुंजोबा चौकात शनिवारी (ता. ११) रात्री पूर्ववैमनस्य आणि वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत संशयितांनी गोळीबार केल्याने, यात कुत्रा जखमी झाला व एका महिलेलाही दुखापत झाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रारंभी पोलिसांकडून गोळीबाराचा इन्कार करण्यात आला. मात्र घटनेचा सीसीटीव्ही फुटेजच व्हायरल झाल्यानंतर अखेर पंचवटी पोलिसात प्राणघातक हल्ल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (After CCTV footage went viral case finally filed in firing case Nashik News)

विशाल चंद्रकांत भालेराव (रा. मुंजाबाबा गल्ली), संदीप अहिरे, जय खरात, विकी वाघ व त्यांचे तीन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. यातील मुख्य संशयित विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचे दोन तर प्राणघातक हल्ल्याचा एक असे तीन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

प्रेम दयानंद महाले यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ११) रात्री प्रेम हा मित्र युवराज भोळके याच्यासह उभा असताना संशयित विशाल, संदीप, जय खरात हे हातात कोयते घेऊन आले. विकी वाघ याचे हातात गावठी कट्टा होता.

त्या वेळी विशालने प्रेमवर कोयत्याने हल्ला चढविला. प्रेम घाबरून घराच्या दिशेने पळाला. संदीपने वीट प्रेमच्या दिशेने फेकून पायाला दुखापत केली. त्याच वेळी विकीने गावठी कट्ट्यातून प्रेमच्या घराच्या दिशेने गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात प्रेमची आई उषा यांच्या उजव्या छातीजवळून एक गोळी चाटून गेली. तर, त्याची मावशी जया चोथे यांचा पाळीव कुत्रा टॉमी याच्या पायालादेखील गोळी लागली. यानंतर संशयितांनी गल्लीतील इतर लोकांना व महिलांना शिवीगाळ करून दमदाटी करून पळ काढला.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक रणजित नलवडे, डॉ. आँचल मुदगल घटनास्थळी दाखल झाले.

वर्चस्ववादातून हल्ला

फिर्यादी प्रेम व त्याचा साथीदार रोहित गांगुर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी संशयित विशाल भालेराव याच्या नातलगांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला होता. त्याच हल्ल्याला उत्तर देण्यासाठी संशयित भालेराव याच्या टोळीकडून प्रतिहल्ला करीत गोळीबार करण्यात आल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच दिंडोरी नाक्यावर एका सराईताची हत्या झालेली असताना पुन्हा गोळीबारीची घटना याच परिसरात घडली. त्यामुळे या परिसरात वर्चस्ववादातूनच टोळ्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :NashikCCTV Camera