Anandacha Shidha : आनंदाचा शिधा हरवला तरी कुठे? पाडव्यालाही नाही पोचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anandacha Shidha

Anandacha Shidha : आनंदाचा शिधा हरवला तरी कुठे? पाडव्यालाही नाही पोचला

पिंपळगाव बसवंत : राज्यातील सत्तांतरानंतर दिवाळीला शिंदे- फडणवीस सरकारने १०० रुपयांत गरिबांना आनंदाचा शिधा जाहीर केला. मात्र, दिवाळी आनंदाच्या शिध्याविनाच पार पडली होती.

आताही गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शंभर रूपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय जाहीर केला. पण, गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकला आणि आनंदाच्या शिध्याची गरिबांना चव घेताच आली नाही.

निफाड तालुक्यात लाभार्थीना द्यायची आनंदाच्या शिधाची सामग्री अद्याप पोचलेली नाही. दरम्यान, तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेतील साधारण एक लाख लोक या योजनेचे लाभार्थी असून त्यांना साधारण तीस हजार कीट लागणार आहेत. दरम्यान, या योजनेतील कीटसाठी शिधा खासगी वितरकांकडून खरेदी केला जात आहे.

निफाड तालुक्यातील शासकीय गोदामापर्यंत देखील रवा, साखर, गोडेतेल हा शिधा आलेला नाही. आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत तरी शिधा लाभार्थीच्या हाती पडेल का, असा प्रश्न आहे. याला संपाचे कारण पुढे केले जात असले तरी याची खरेदी खासगी वितरकांकडून असल्याने हे कारण न पटणारे आहे अशा प्रतिक्रिया लाभार्थींनी दिल्या आहेत.

सरकार आल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारने मागच्या दीपावलीला शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. यामध्ये साखर, दाळ, तेल अशा वस्तूंचा समावेश होता. मात्र, योजनेचा गोंधळ उडाला आणि गरिबांची दिवाळी आनंदाच्या शिध्याविनाच साजरी करावी लागली. आता हिंदू नववर्षाचा सण गुढी पाडवा देखील शासनाच्या आनंद शिध्याविनाच साजरा करावा लागला. कर्मचाऱ्यांच्या संपामुळेही शिधा पोहोचण्यास विलंब झाल्याचे सांगितले जात आहे.

पाडव्याचा सण झाल्यानंतर आनंदाचा शिधा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार आहे. केवळ शंभर रुपयांत आनंदाचा शिधा या माध्यमांतून पाच वस्तू देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यात निफाड तालुक्यात अंत्योदय योजनेतील ५७ हजार व्यक्ती व प्राधान्य कार्डचे दहा हजार कार्ड धारक आहेत. निफाड तालुक्यात १५४ रेशन दुकानात आनंदाचा शिधा आला का यांची चौकशीसाठी नागरिक हेलपाटे मारत आहे.

''आनंदाचा शिधा योजनेची शासनाने घोषणा केल्यानंतर गुढीपाडव्याचा सण गोड होईल, असे वाटले होते. त्यासाठी चार चकरा रेशन दुकानात मारल्या पण आनंदाचा शिधा काही मिळाला नाही.'' - शांताबाई जाधव, लाभार्थी, पिंपळगाव बसवंत.

''आनंदाचा शिधा लवकरच प्राप्त होईल, तो मिळताच नियोजन करून त्याचे वाटप केले जाणार आहे.'' - उल्हास टर्ले, तालुका पुरवठा अधिकारी, निफाड.

टॅग्स :Gudi Padwa FestivalNashik