पुरातन मंदिरे बनताहेत कचराकुंडी; ऐतिहासिक खैराईचा किल्ला असलेल्या ठाणपाड्यातील विदारक चित्र... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ancient temples

नाशिक : पुरातन मंदिरे बनलीये गावाची कचराकुंडी...

नाशिक : एखाद्या वैभवाची अवदसा होते तेव्हा त्याला, ‘काळाचा महिमा’ असं म्हटलं जातं. इथे माणूस काळाचा फास हातात धरून उभा आहे. इथल्या तीन मंदिरांभोवती त्याने तो आवळला आहे. अगोदर परकीय आक्रमकांच्या रूपाने आणि आता स्वकीय बनून! कोणीतरी जाऊन सांगायला हवं, भारत आता स्वतंत्र झाला आहे, सोडा तो काळाचा फास... करा ती तीन मंदिरे मुक्त. हवं तर नका करू त्यांची डागडुजी किंवा पुनर्निर्माण, तिथल्या शिवशंकराची अप्रतिष्ठा करू नका. तिथला बुद्ध, महावीर किंवा जो इष्ट देव असेल त्याला असा कचऱ्यात लोटू नका. गणपती, देवी-देवता, यक्ष, सूरसुंदव्या, कीर्तीमुख, व्यालादींच्या मूर्ती केरापासून मुक्त करा... हे दृश्‍य होते, ते ठाणपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील कचराकुंडी बनलेली पुरातन तीन मंदिरांचे.

मंदिराचा उपयोग कचराकुंडी म्हणून...

नाशिक जिल्ह्यातील ठाणपाडा गावची ओळख म्हणजे तिथला ऐतिहासिक खैराईचा किल्ला. एकेकाळी हा प्रसिद्ध अशा रामनगर साम्राज्याचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उत्तर काळात हा किल्ला जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. त्याला त्यांनी भेटही दिली होती. त्यांची पहिली सुरतेची स्वारी याच प्रांतातून झाली आहे. गडावर अजूनही चहूबाजूंनी भक्कम तटबंदी आहे. दोन तोफा ज्या ऊन- वाऱ्याच्या भरवशावर पडलेल्या आहेत. त्यातल्या एका तोफेवर काहीशी देवनागरी अक्षरे दिसतात. ती खालच्या बाजूला असल्याने वाचता येत नाहीत. किल्ल्याप्रमाणेच ठाणपाड्याची ओळख ठरावी, अशी ही तीन मंदिरे आज कमालीच्या जीर्णशीर्ण दशेत आहेत. त्यातली दोन बऱ्यापैकी उभी आहेत. परंतु सांगताना अंगावर शहारे येतात, त्यांचा उपयोग चक्क... कचराकुंडी म्हणून केला जात आहे. तिसरे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, त्याच्या अनेक मूर्ती काळाच्या दयेवर उघड्यावर ऊनवारा खात आहेत, अशी माहिती दुर्गवीर प्रशांत परदेशी, दीपक पवार व विनोद मनोहर यांनी दिली.

हेही वाचा: नाशिकच्या गोदातीरी भाविकांची गर्दी...पाहा PHOTOS

महसूल विभागासह नाशिककरांना संधी

या परिसरात केवळ पावसाच्या भरवशावर होणारी शेती ही सर्वांत मोठी अडचण आहे. पावसाळ्यानंतर शेतकरी मोलमजुरीसाठी बाहेर पडतो. त्यातल्या काही जणांना हलाखीच्या दशेत शेतीवाडी विकावी लागली आहे. संपूर्ण परिसर प्रचंड पावसाचा असून, चहूबांजूनी डोंगरांनी वेढलेला आहे. गावात खडकाळ जमिनीचे फार मोठे प्रमाण आहे. डोंगर फोडूनच बांधकामासाठी दगड वापरण्याचा अभिशाप लाभलेल्या नाशिक जिल्ह्याला या निमित्ताने जमिनीतून दगड काढण्याची एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जागेत खडक आहे, त्यांना तिथे जमिनीत दगडाची खाण चालविता येईल. याच खाणीत त्यांनी पाणी साठवणीची व्यवस्था केली, तर खाण संपल्यानंतर धरणातला गाळ आणून आपल्याच जमिनीत शेतीही करता येईल व आपल्याच जमिनीत वर्षभर पुरेल इतके पाणीही साठवता येईल.

त्यासाठी जमिनीतला दगड विकून आवश्यक पैसा उभा राहील, शासनालाही महसुलापरी महसूल मिळेल, शिवाय डोंगर फोडून केल्या जाणाऱ्या खाणींवर हा नामी उपाय असेल. सध्या नाशिकमध्ये डोंगर वाचवा चळवळ वेगात सुरू आहे. त्यामुळे डोंगर आणि त्यावरचे जंगल आणि डोंगरांमुळेच उगम पावणाऱ्या नद्या व त्यांचे स्रोत वाचविता येतील. याचा उपयोग तमाम जीवसृष्टीला होईल, त्यात माणसाचा अग्रक्रम राहील. नुकसान तर कोणाचेच होणार नाही, हे मात्र नक्की!

हेही वाचा: Nashik : वादग्रस्त उड्डाणपुलाचा वाद पालकमंत्र्यांच्या दरबारी

''दोन मंदिरे अजूनही वाचविली जाऊ शकतात. अगोदर त्यात कचरा टाकणे बंद करावे. परिसरातील रहिवाशांचे गावात स्थलांतर करून मंदिर परिसर मोकळा करावा. दगड व मूर्ती गोळा करून उपलब्ध दगडांच्या सहाय्याने प्राथमिक संवर्धन करावे.'' - प्रशांत परदेशी, दुर्ग संवर्धन समिती, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiktemplegarbage news
loading image
go to top