esakal | लॉकडाउनमुळे उतरली टरबुजाची लाली! ऐन हंगामात मातीमोलाने विक्रीची नामुष्की

बोलून बातमी शोधा

Farmer
लॉकडाउनमुळे उतरली टरबुजाची लाली! ऐन हंगामात मातीमोलाने विक्रीची नामुष्की
sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाआघाडी सरकारने १५ एप्रिलपासून राज्यात लॉकडाउन जाहीर केल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांना सर्वांत मोठा आर्थिक फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात सर्वाधिक मागणी असलेले टरबूज मातीमोल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लॉकडाउन काळात फळविक्रीवर निर्बंध आल्याने दरात घट झाल्याचे कृषी अभ्यासकांचे म्हणणे आहे.

मोसम खोऱ्यात उन्हाळ्यात अनेक शेतकरी दोन महिन्यांचे पीक म्हणून टरबुजाची लागवड करतात. टरबुजामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाण्याचे प्रमाण असल्याने उष्णतेचा दाह कमी होऊन आरोग्यवर्धक असलेले टरबूज लहानांपासून ज्येष्ठांचे सर्वांत आवडते फळ मानले जाते. आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. जीवनसत्त्वांच्या मुबलक प्रमाणामुळे, शरीराची रोगप्रतिकारशक्ती यामुळे मजबूत होते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांवर आळा घालण्यासाठीदेखील टरबूज खूप प्रभावी आहे. रक्तदाब आणि साखर पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.

उत्पादन खर्चदेखील निघेना

पारनेर (ता. बागलाण) येथील प्रयोगशील युवा शेतकरी मयूर देवरे याने यंदा आपल्या शेतातील दीड एकर क्षेत्रात सिजेंटा कंपनीच्या हॅपी फॅमिली या वाणाची ६ मार्चला लागवड केली. दर्जेदार फळनिर्मिती हे उद्दिष्ट असल्याने सीडलेस टरबुजाची महागडी रोपे त्याने खरेदी केली. गेल्या दोन महिन्यांच्या काळात शेणखत, मल्चिंग पेपर, विविध रासायनिक व सूक्ष्म खतांची मात्रा आदींवर सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च करून निर्यातक्षम टरबूज पिकविले आहे. लॉकडाउनपूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी १६ रुपये प्रतिकिलो या भावाप्रमाणे सौदादेखील केला होता; परंतु सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या दुष्टचक्रामुळे अतिशय कमी भावाने फळांचे व्यापारी टरबूज मागणी करत असल्याने उत्पादन खर्चदेखील भरून निघणार नाही, अशी अवस्था आहे.

हेही वाचा: आरोग्य सांभाळा! नाशिकमध्ये चालता-बोलता होतायेत मृत्यू; दिवसभरात ५ घटना

विक्री करण्याशिवाय पर्याय नाही..

गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे उत्पादन खर्च २५ हजार रुपयांनी वाढला. गेल्या दोन महिन्यांच्या काळात अहोरात्र मेहनत घेतल्याने शेतात तीन किलोपासून सात किलोंपर्यंतचे फळ तयार केले. सध्या शेतात सुमारे ३० टन माल तयार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे शेतात कामासाठी मजूर मिळत नाहीत. मिळाले तर ३०० ते ४०० रुपये रोज मागतात. फळांची साठवणूक करणे शक्य नसल्याने मातीमोल का असेना, पण विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मयूर देवरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सीडलेस टरबूज लागवड खर्च :

  • रोपांची संख्या : १० हजार

  • एक रोपाची किंमत : ७.५० रुपये

  • शेणखत २० टन : ३५ हजार

  • मल्चिंग पेपर : ९ हजार

  • रासायनिक खते : ४२ हजार रुपये

  • ठिबक सिंचन : ५ हजार

  • औषध फवारणी : २० हजार

  • मजुरी : ९ हजार

* एकूण खर्च : सुमारे २ लाख

हेही वाचा: मुंबईहून उत्तर प्रदेशात निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; चौघे जागीच ठार

दोन महिने सातत्यपूर्ण मेहनतीमुळे निर्यातक्षम टरबूज तयार झाले आहे; परंतु लॉकडाउनमुळे फळविक्रीसाठी अकरापर्यंत सूट असल्याने शेतमालाला उठाव नाही. लॉकडाउनच्या फटक्यामुळे फळे, भाजीपाला यांच्या किमती ५० टक्क्यांनी घसरल्या आहेत. बाहेरील राज्यातील व्यापारीदेखील लॉकडाउनच्या भीतीने माल घेण्यास उत्सुक नाहीत. उत्पादनखर्च व उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

-मयूर देवरे, प्रयोगशील शेतकरी, पारनेर