Success Story: माळमाथ्यावरील भुमिपूत्र मंत्रालयात लिपीक; प्रशांत जाधवांच्या परिश्रमाला फळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fellow friends preparing for the competitive exam at Garuda Library cheered Prashant Jadhav on their shoulders for being selected as the Ministry Clerk.

Success Story: माळमाथ्यावरील भुमिपूत्र मंत्रालयात लिपीक; प्रशांत जाधवांच्या परिश्रमाला फळ

मालेगाव शहर (जि. नाशिक) : हाडाची काडे केल्याशिवाय फळ काही मिळत नाही, हे उगाचच जुनी माणसं म्हणत नाही. शेतकरी आयुष्यभर राब राब राबतो. तेव्हा कुठं शिवार फुलतं. शिक्षण हे वाघिणीचे दूध असले तरी ते नुसतं पिऊन चालणार नाही तर ते जिद्दीने पचवत भविष्याची वाटचाल दिशादर्शक करणारे असायला हवे. येणाऱ्या अपयशाने खचून न जाता अभ्यासाला सातत्याने परिश्रमाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते हे नाळे (ता. मालेगाव) येथील धडपड्या प्रशांत जाधव याने दाखवून दिले. माळमाथ्यासारख्या अवर्षणप्रवण भागातील अरूण जाधव या शेतकऱ्याच्या लेकाने स्पर्धा परीक्षेला गवसणी घालत ‘क्लर्क’ पदाने मंत्रालय गाठले. (Arun Jadhav from malmatha cracked competitive examination reached ministry post as clerk nashik news)

छोट्याशा जेमतेम पाचशे लोकवस्तीच्या खेड्यात जिल्हा परिषद शाळेत बालशिक्षण घेत माध्यमिक शिक्षण चिखलओहोळ येथे दोन अडीच किलोमीटर पायपीट करून मिळवले. सततच्या शेतीच्या कामात गुंतलेले कुटुंब, बापाचं जेमतेम शिक्षण अशा परिस्थितीत प्रशांतने बहिणीच्या गावी वरखेडे (धुळे) येथे बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पुन्हा पुढे काय, असे असताना आशेचा किरण म्हणजे धुळे येथील आत्याकडे (सुरेश कोते यांच्याकडे) राहून बारावी विज्ञाननंतर इंजिनिअरींग, फार्मसीकडे कल असतानाच जयहिंदसारख्या संस्थेत कला शाखेची पदवी घेत स्पर्धा परिक्षेचे ध्येय ठेवले.

मुळ नाळे येथील असलेल्या कोते या चार भावंडांच्या गोकुळात शैक्षणिक क्रांती त्यांच्या मुलांनी घडवलेली होती. स्पर्धा परिक्षेने कृषी विस्तार अधिकारी, दोन फौजदार, दोन शिक्षक असे वैभव मिळाले. ही आतेभावांची प्रेरणा पाठबळ देणारी ठरली अन् खडतर प्रवास सुकर झाला.

पदवीच्या शिक्षणात उपजत गुणांना संधी मिळाल्यामुळे प्रशांत अनेक छोट्यामोठ्या पारितोषिकांचा मानकरी ठरला. शिक्षण घेताना मुळ जन्मजात नाळ शेतीमातीशी घट्ट ठेवून शेतीची कामे, वखरणी, नांगरणी रात्री- अपरात्री पिकाला पाणी देणे. एवढ्यावरच न थांबता मजूर भेटत नसल्याने कांदा लागवड, कपाशी वेचणी हे प्रशांतचे नित्याचेच काम होते. पदवीच शिक्षण घेताना ‘कमवा व शिका’ हा प्लान बी यशस्वी करत डीटीपी डिझाईनींग, टायपिंग कोर्सेस पूर्ण केल्याने शिक्षणाला हातभार लावला.

हेही वाचा: Leonid Meteor Shower : ‘लिओनिड उल्कावर्षाव’ची शुक्रवारी पहाटे अनुभूती

२०१७ ला पीएसआय व सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी मुख्य परीक्षा दिली. अवघ्या सहा गुणांची हुलकावणी तरी अपयशाने न खचता जिद्दीने पीएसआय फिजीकल साठी धाव धावला. शारीरिक चाचणीत यशस्वी होत मुलाखतीत गुणवत्तेत आला. मात्र, निवड क्षणभंगुर ठरली. पुन्हा परिक्षा देत मंत्रालय क्लर्क पदांवर निवड होत प्रशांत यशस्वी झाला.

अजूनही प्रयत्न सोडलेला नसून पीएसआय व्हायचे स्वप्न सत्यात साकारायचे असल्याचे प्रशांतने सांगितले. अभ्यासाने कंटाळला तर शब्दांच्या दुनियेत रमणारा हा नवकवी बापाचं दुःखही सहजपणे मांडतो. या खडतर वाटचालीत आत्या, आई, भाऊ, भावजय, बहिण- पाहुणे, आतेभाऊ यांचे भक्कम पाठबळ, आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी प्रेरक ठरल्याचे तो सांगतो.

"गावाच्या मातीत राबणाऱ्या शेतकरी कुटुंबातील प्रशांत हुरहुन्नरी व जिद्दीने शिक्षण घेत स्पर्धा परिक्षेचे ध्येय ठेवले. अजूनही मोठा पल्ला गाठायचा त्याचा ध्यास आहे. त्याच्यातील अनेक गुणांनी आमच्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले." - गणेश कोते, शिक्षक, शिरूड (जि. धुळे)

"‘हौसला रख, वो मंजर भी आयेगा’ या ओळींप्रमाणे ध्येय ठेवून पुढील पदांसाठी मार्गक्रमण करीत आहे. कुटुंबाला हातभार म्हणून मिळालेली संधी समाजाच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे सत्कारणी लावेल. ग्रामीण माणसांच्या सेवेसाठी कटीबद्ध आहे."

- प्रशांत जाधव, मंत्रालय लिपीक, मुंबई

हेही वाचा: Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; ‘नमामि गोदा’ प्रकल्प रेंगाळतोय कागदावरच