esakal | घरात अठराविश्‍वे दारिद्र्य अन् मनात जिद्द! प्रतिकूल परिस्थितीत अश्विनीचे दहावीत यश
sakal

बोलून बातमी शोधा

ssc success

आईला घरकामात मदत करून अश्विनीने मिळविले यश!

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : घरात अठराविश्‍वे दारिद्र्य... दहा बाय दहाचे भाडेतत्त्वाचे घर... मोलमजुरी करणारे आई- वडील... अशाही हलाखीच्या परिस्थितीत मोठ्या जिद्दीने सामोरे जात पंचवटीतील बोरगड येथील विद्यार्थिनीने दहावीत ७८ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे अभ्यासाबरोबर आईला घरकामात मदत करून तिने मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Ashwini-achieves-success-by-helping-mother-marathi-news-jpd93)

आईला घरकामात मदत करून मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक

येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या अश्विनी शिवाजी राठोड या विद्यार्थिनीने हे यश मिळवले आहे. वडील शिवाजी राठोड, आई कविता, एक लहान भाऊ व बहीण असे त्यांचे कुटुंब. गावी वडिलांना हाताला योग्य तो कामधंदा नव्हता. त्यामुळे दोन ते तीन वर्षांपूर्वीच त्यांनी नाशिक गाठले व बोरगड परिसरात छोटीशी खोली भाडेतत्त्वावर घेतली. घरात थोरली असलेल्या अश्विनीला शिक्षणाची मोठी आवड. त्यामुळे गाव बदलले तरी शिक्षणात खंड पडू नये, म्हणून बोरगड येथील नूतन माध्यमिक विद्यालयात तिने प्रवेश घेतला व पुढील शैक्षणिक प्रवास सुरू झाला. हलाखीच्या परिस्थितीची जाणीव असल्याने आईस घरकामात पूर्णवेळ मदत करीत अश्विनी अभ्यास करत होती. अशाही परिस्थितीत खचून न जाता तिने जोमाने व मोठ्या जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. शुक्रवारी (ता.१६) जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तब्बल ७८.५० टक्के गुण मिळाल्याचे पाहून कष्टाचे चीज झाल्याची भावना तिच्यासह कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. आई-वडिलांसह वर्गशिक्षक ए. सी. आंधरे, ज्येष्ठ शिक्षिका एस. पी. जाधव, माजी मुख्याध्यापक पी. एस. पाटील, शिक्षिका एस. व्ही. आवारे व मुख्याध्यापक के. के. काळे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अश्विनीने सांगितले.

हेही वाचा: …तोपर्यंत मनसेसोबत युती अशक्य; चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image