Atal Bhujal Yojana : भूजलपातळी घटलेल्या गावांवर भर देणार; राज्यातील 1339 गावांचा समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atal Bhujal Yojana

Atal Bhujal Yojana : भूजलपातळी घटलेल्या गावांवर भर देणार; राज्यातील 1339 गावांचा समावेश

नामपूर (जि. नाशिक) : राज्यात शेती सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी नियमबाह्यपणे ७०० ते ८०० फुटांपर्यंत बोअरवेल खोदले जात असल्याने दिवसेंदिवस भूजलपातळीत कमालीची घट होत आहे.

उन्हाळ्यात राज्यातील हजारो गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे शाश्वत जलस्रोत निर्माण करण्यासाठी भूजलपातळी खालावलेल्या गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

यामुळे राज्यातील हजारो गावांना जलसंजीवनी मिळून पाणीटंचाई दूर होण्यास मदत मिळेल. या योजनेत राज्यातील एक हजार ३३९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. (Atal Bhujal Scheme Emphasis will placed on villages ground water level decreased Including 1339 villages in state nashik news)

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून संपूर्ण देशासाठीचा २०२२ चा वास्तविक भूजल स्रोत मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातील ८० तालुक्यांमध्ये मध्यम ते अति या प्रमाणात भूजलपातळी कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील १,३३९ गावांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

अटल भूजल योजना शाश्वत भूजल व्यवस्थापनाचे लक्ष्य ठेवून कार्यान्वित करण्यात आली आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक आराखडा मजबूत करण्याच्या मुख्य उद्देशाने ही योजना पथदर्शी म्हणून तयार करण्यात आली आहे.

भारत सरकारने २०१८ मध्ये जागतिक बँकेकडून आर्थिक मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये अटल भूजल योजना सुरू केली. ही योजना जलजीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News : नव्या वर्षात उशिराचा Episode संपवावा; प्रवाशांची माफक अपेक्षा

या योजनेकरिता प्राप्त होणाऱ्या निधीपैकी ५० टक्के केंद्र, उर्वरित ५० टक्के निधी जागतिक बँकेकडून अनुदान आणि प्रोत्साहन स्वरूपात दिला जाणार आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास स्थानिक ग्रामस्थांना गावातील भूजल किती हे सांगून जलअंदाजपत्रक देण्यात येत आहे. हे भूजल किती दिवस पुरू शकेल, याची माहिती देण्यात येत आहे.

भूजलाची मागणी कमी करण्यासाठी ठिबक सिंचनासाठीच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाणी लागणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी जनजागृती करण्यात येत आहे.

"केंद्राच्या भूजलस्रोत मूल्यांकन अहवालानुसार राज्यातील २७२ पाणीस्रोत सुरक्षित आहेत. ८० तालुक्यांत मध्यम ते अति या प्रमाणात भूजलपातळी कमी आहे. या ठिकाणचे भूजल धोक्याच्या पातळीकडे जात आहे. त्यामुळे राज्यातील १,३३९ गावांत अटल भूजल योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये लोकसहभागातून पाणीपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत." -चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

हेही वाचा: Jindal Fire Accident : लष्कराने दिले 2 हेलिकॉप्टर अन् जवान!