सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण! 30 वर्षांपासून ZP शाळांत मुलींना दररोज 1 रुपयाच उपस्थिती भत्ता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP school Girls

सावित्रीच्या लेकींची रुपयावर बोळवण! 30 वर्षांपासून ZP शाळांत मुलींना दररोज 1 रुपयाच उपस्थिती भत्ता!

चांदोरी (जि. नाशिक) : दारिद्र्यरेषेखालील, तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रतिविद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो.

गत ३० वर्षांपासून या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एका पैशाचीही वाढ केली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरू केलेल्या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींकडून होत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. (Attendance Allowance for girls in ZP schools for 30 years only Rs 1 per day Nashik News)

१९९२ ला तत्कालीन सरकारने प्रतिविद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ही योजना सुरू केली, परंतु ३० वर्षांनंतरही सावित्रीच्या लेकींना अवघा एक रुपयाच दिला जात आहे. शैक्षणिक साहित्याच्या किमतीही वाढल्या असून, पेनमधील कांडीची किंमतही एक रुपयापेक्षा जास्त आहे.

तरीही आजपर्यंत कोणत्याच सरकारने विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. मुलींना आजही ३० वर्षांपूर्वीचा तेवढाच प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झाली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सरकारने थट्टा थांबवावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Family Welfare Surgery Camp : कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांसाठी सर्जन मिळत नसल्याने कॅम्प बंद!

"विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्त्यात नक्कीच वाढ व्हायला हवी. परंतु वरिष्ठ पातळीवरून यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. लोकप्रतिनिधींनी नियमित पाठपुरावा करणे गरजेचे आहे."

-प्रदीप कुटे, केंद्रप्रमुख, सायखेडा

"महागाईच्या या जगात एक रुपयात काय येते, याचा शासनाने विचार करावा. आर्थिक निकषावर प्रोत्साहन भत्त्यात वाढ गरजेची आहे. किमान दहा रुपया तरी प्रतिदिन प्रोत्साहन भत्ता मिळावा."

- बाजीराव कमानकर, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ निफाड

"३० वर्षांच्या काळात आमदार, खासदारांच्या भत्त्यात भरघोस वाढ झाली. वेतन आयोग लागू झाला. मात्र शैक्षणिक भत्त्यात वाढ झाली नाही. शिक्षण विभाग एक रुपया देऊन आम्हाला गरीब असल्याची जाणीव करून देत आहे." - संदीप आढाव, पालक, भेंडाळी

हेही वाचा: गतीशक्तीच्या बदलात Passenger झाली इतिहासजमा; नांदगावसह सर्वत्र सध्या ‘वंदे भारत’चा बोलबाला!

टॅग्स :NashikZP Schools