Nashik : धावतपळत परीक्षार्थींची टीईटीला हजेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : धावतपळत परीक्षार्थींची टीईटीला हजेरी

Nashik : धावतपळत परीक्षार्थींची टीईटीला हजेरी

नाशिक : तब्‍बल दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर झालेल्‍या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ला परीक्षार्थींचा चांगला प्रतिसाद मिळाला. रविवारी (ता. २१) झालेल्‍या परीक्षेतील दोन्ही पेपरला उपस्‍थितीचे प्रमाण ८५ टक्क्‍यांहून अधिक राहिले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था ठप्प असताना, ग्रामीण भागातील परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोचण्यासाठी धावपळ करावी लागली. अशात शहरातील काही केंद्रांवर अवघ्या पाच- दहा मिनिटांच्‍या विलंबाने पोहोचलेल्‍या परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्‍याने तेथे तणाव निर्माण झाला होता. जिल्‍ह्यात पाच माध्यमांसाठी ४३ केंद्रांवर परीक्षा पार पडली.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

कोरोना महामारीमुळे तसेच अन्‍य विविध परीक्षांच्‍या वेळापत्रकामुळे टीईटी परीक्षेला मुहुर्त लागत नव्‍हता. अशात सध्या राज्‍यासह जिल्‍ह्‍यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था ठप्प आहे. त्‍यामुळे ग्रामीण भागातून, अन्‍य जिल्‍ह्यातून येणाऱ्या परीक्षार्थींची दमछाक झाली. कसेबसे मिळेल त्‍या वाहनाने, तर काही परीक्षार्थी खासगी वाहनाने परीक्षा केंद्रापर्यंत पोचले.

पहिल्‍या सत्रात सकाळी पेपर क्रमांक एक झाला. यात मराठी, इंग्रजी, गणित, मानसशास्‍त्र, परिसर अभ्यास विषयाचे एकूण दीडशे गुणांसाठी प्रश्‍न विचारण्यात आले. तर पेपर क्रमांक दोन दुपारच्‍या सत्रात झाला. या परीक्षेत मराठी, इंग्रजी, मानसशास्‍त्र, सामाजिकशास्‍त्र विषयाचे प्रश्‍न विचारले गेले.

नाकारला परीक्षार्थींना प्रवेशअनेक परीक्षा केंद्रांवर अवघ्या काही मिनिटांच्‍या विलंबाने आलेल्‍या परीक्षार्थींना प्रवेश नाकारला. काठे गल्‍लीतील रवींद्र विद्यालय, पंचवटीतील उन्नती विद्यालय, गंगापूर रोडवरील नवरचना तसेच मराठा हायस्‍कूल यांसह बॉईज टाऊन, सिडकोतीलही काही शाळांमध्ये उशीरा आलेल्‍या परीक्षार्थींना मज्‍जाव करण्यात आला. अशा केंद्रांवर काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवार आपआपल्‍या परीने अधिकारी, नेते मंडळीशी संपर्क साधत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्‍न करीत होते. मात्र, त्‍यांच्‍या पदरी निराशाच पडल्‍याचे बघायला मिळाले.

अनेकांनी दिली जोडीने परीक्षा

या शिक्षक पात्रता परीक्षेत अनेकांनी जोडीने सहभाग नोंदविला. अशात आपल्‍या लेकराला घेऊन दांपत्‍य परीक्षा केंद्राच्‍या आवारात बघायला मिळाले. दोन्‍ही पेपरमधील मध्यांतराच्‍या वेळी केंद्रांच्‍या आवारात परीक्षार्थींसह या दांपत्‍यांनीही ठाण मांडले असल्‍याचे चित्र बघायला मिळाले. अनेक परीक्षार्थींनी पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन्‍ही परीक्षांमध्ये सहभाग नोंदविला.

"वाहन उपलब्‍ध नसल्‍याने काही मिनिटांच्‍या विलंबाने परीक्षा केंद्रावर पोहचलो तरी प्रवेश नाकारण्यात आला. एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये सहकार्य केले जात असतांना, या परीक्षेत मात्र अडवणूक करण्यात आली. यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले."

-कल्‍पेश करंजकर

"पेपर क्रमांक एकमध्ये गणिताचे प्रश्‍न काही प्रमाणात अवघड होते. तरीदेखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. पेपर दोनदेखील सोपा गेला. कोरोनाविषयक नियमांचे पालन करत परीक्षेला सामोरे गेलो."

-रमेश सांगळे

"परीक्षा केंद्राची पाहणी एक दिवस आधी करण्याची व निर्धारीत वेळेत उपस्‍थित राहाण्याच्‍या स्‍पष्ट सूचना प्रवेशपत्रावर दिलेल्‍या होत्‍या. अशात तीन-चार परीक्षा केंद्रांवर तुरळक परीक्षार्थी उशीरा दाखल झाल्‍याने नियमानुसार त्‍यांना प्रवेश नाकारले गेले. उर्वरित सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली आहे."

-राजीव म्‍हसकर, जिल्‍हा परीक्षा नियंत्रक

"पेपर एक अत्‍यंत सोपा गेला. दिलेल्‍या वेळेत पेपर सोडविला असून, आता चांगल्‍या निकालाची अपेक्षा आहे."

-पुंडलिक महाले

हेही वाचा: लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

आकडे बोलतात...

पेपर प्रविष्ठ उपस्‍थित अनुपस्‍थित

पेपर एक १५,१४४ १३,०१६ २,१२८

पेपर दोन १३,५७७ ११,९२५ १,६५२

loading image
go to top