कालिदास कलामंदिराला प्रतीक्षा प्रेक्षकांची! लॉकडाउनपासून एकही कार्यक्रमाचे बुकिंग नाही 

kalidas natygrah.jpg
kalidas natygrah.jpg

जुने नाशिक : कोरोनाची भीती आणि आयोजकांकडून २५ ते ५० टक्के भाड्यावर कलामंदिर उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे सरकारकडून सिनेमागृहासह नाट्यगृह खुले करण्यास परवानगी देऊन महिना उलटला, तरीदेखील अद्याप एकाही कार्यक्रमाचे बुकिंग झालेले नाही. जानेवारीच्या मध्यापासून मात्र कालिदास कलामंदिर पूर्वीप्रमाणे सुरू होण्याची शक्यता व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

५० टक्के प्रेक्षकांनाच नाट्यगृहात परवानगी
महापालिका आणि कालिदास कलामंदिर व्यवस्थापनाकडून कलामंदिराची स्वच्छता करण्यासाह विविध प्रकारची कामे सुरू केली आहेत. सोमवारी (ता. ७) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता सुरू केली आहे. काही दिवसांत संपूर्ण नाट्यगृह सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. त्यासाठी घनकचरा विभागास पत्र देण्यात आले आहे. लायटिंग, साउंड सिस्टिमसह अन्य विविध प्रकारच्या कामांसाठी संबंधित विभागांना पत्र देण्यात आले आहे. कार्यक्रमांच्या अनुषंगाने कालिदास कलामंदिर सज्ज केले जात आहे. असे असले तरी केवळ ५० टक्के प्रेक्षकांनाच नाट्यगृहात परवानगी असणार आहे. प्रेक्षकांना आत प्रवेश देण्यापूर्वी सॅनिटाइझ केले जाणार आहे. ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असणार आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्यासाठी एक खुर्ची सोडून प्रेक्षकांना बसण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. 

व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून भाडे दुरुस्तीचा प्रस्ताव

दुसरीकडे नाट्याचे प्रयोग घेणाऱ्या आयोजकांकडून २५ ते ५० टक्के भाड्यावर नाट्यगृह उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी असल्याने आयोजनाचा सर्व खर्च भरून निघण्यासाठी असे करणे आवश्‍यक असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून भाडे दुरुस्तीचा प्रस्ताव ४ डिसेंबरला वरिष्ठांना सादर करण्यात आला. 

कालिदास कलामंदिर कसे लवकरात लवकर सुरू होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या नाट्यगृह साफसफाईची कामे सुरू आहेत, तर नाटकांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या मागणीनुसार नाट्यगृह भाडे दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. -जे. के. कहाणे, कालिदास कलामंदिर, व्यवस्थापक 

पुण्या-मुंबईतील नाट्यगृहांनी कोरोनाच्या संकटकाळात नाट्य चळवळ टिकवून ठेवण्यासाठी नाट्यसंस्थांना सवलत देऊ केली आहे. नाशिकमधील प्रेक्षकही गेल्या आठ महिन्यांपासून दर्जेदार नाट्यप्रयोगांपासून वंचित आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिक महापालिकेने सुवर्णमध्य साधत नाट्यसंस्थांना सवलत द्यावी, जेणेकरून नाट्यक्षेत्रात पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त होईल. 
-रवींद्र कदम, अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद 

राज्यात सांस्कृतिक चळवळ चांगली फोफावली असून, पुण्या-मुंबईतील नाट्यप्रयोग या परिस्थितीतही हाउसफुल होऊ लागले. तशीच परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण होण्यासाठी महापालिकेने कालिदासच्या भाड्यात ७५ टक्क्यांपर्यंत सवलत द्यायला हवी. याशिवाय नाटकांना पुन्हा ऊर्जितावस्था येण्यासाठी व्हीआयपी रूम, नाटकांच्या जाहिरातींच्या बोर्डाचे दरही कमी करायला हवेत. -जयप्रकाश जातेगावकर, आयोजक 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com