Bakery Products Rates Hike : पावाचे दर 30 टक्क्यांपर्यंत महागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bakery Products

Bakery Products Rates Hike : पावाचे दर 30 टक्क्यांपर्यंत महागले

नाशिक : मिसळ, पावभाजी अन्‌ भूर्जीपासून तर वडापाव, पाव वड्यासोबत खाल्ले जाणारे पाव महागणार आहेत. यासंदर्भात नाशिक शहर बेकरी मालक संघटनेतर्फे मंगळवारी (ता. ८) पत्रकार परिषद घेताना भाववाढ जाहीर केली आहे. सुमारे तीस टक्क्यांपर्यंत दरवाढ होणार असून, सुधारित दर गुरुवार (ता. १०) पासून आकारले जाणार असल्‍याचे संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिली. (Bakery Products Rates Hike Bread prices up to 30 percent Nashik News)

यासंदर्भात संघटनेची भूमिका मांडताना पदाधिकारी म्‍हणाले, की गेल्‍या काही कालावधीत महागाईचा भडका उडालेला आहे. अशात सर्वच वस्‍तूंच्‍या दरांमध्ये वाढ झालेली आहे. तेल, तूप, मैदा असा पाव बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल अन्‍य संसाधनांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे पावाचे दर वाढविण्याचा निर्णय संघटनेच्‍या सदस्‍यांनी घेतला आहे. सुमारे तीस टक्क्यांपर्यंत दरवाढ होईल. सुधारित दर गुरुवारपासून लागू होणार असल्‍याचे या वेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस राहुल शिंदे, मोबिन खान, ललित मानकर, नीलेश सोसे, फैयाज खान, नसीम खान, झुबेर सय्यद, नफिस खान, दीपक काळे आदी उपस्‍थित होते.

दोन वर्षांनंतर दरवाढ

जानेवारी २०२० मध्ये पावाचे दर वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यानंतर कोरोना महामारीमुळे लॉगडाउन लागल्‍याने बेकरी व्‍यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला होता. अशात दोन वर्षांहून अधिक कालावधीनंतर पावाचे दर वाढविले असल्‍याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: Sadabhau Khot : आजचा शत्रू उद्याचा मित्र, तर उद्याचा मित्र परवाचा शत्रू...: सदाभाऊ खोत

असे असतील सुधारित दर

सद्यःस्थितीत पावाच्‍या आकारानुसार शहरातील वेगवेगळ्या परिसरात विभिन्न दर आकारले जातात. २० रुपयांपासून तर ३० रुपये डझन या दराने सद्यःस्थितीत पावाची विक्री होते आहे. परंतु आता दरवाढ जाहीर केल्‍याने यापुढील काळात ३० ते ४० रुपये प्रतिडझन पावासाठी मोजावे लागण्याची शक्‍यता आहे.

मिसळ, पावभाजीसह भूर्जीचे दरवाढीची शक्‍यता

दरम्‍यान पावाच्‍या दरांमध्ये वाढ झाल्‍यास मिसळ, पावभाजीसह भूर्जीच्‍या प्‍लेटचे दर वाढू शकतात. हॉटेल व्‍यावसायिकांकडून जादाचे पैसे ग्राहकांकडून वसुल केले जाणार असल्‍याने आगामी काळात या पदार्थांवर ताव मारताना खवय्यांना काही प्रमाणात खिसा हलका करावा लागणार आहे.

दैनंदिन चार लाख पावांची विक्री

नाशिक शहरातील सुमारे पन्नास उत्‍पादकांकडून रोज पावाच्‍या सरासरी पाचशे लाद्या बनविल्‍या जातात. या हिशोबाने दैनंदिन चार लाख पावांची विक्री नाशिक शहर व परिसरात होत असल्‍याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे ऐंशी टक्‍के खरेदी ही हॉटेल व्‍यावसायिक, मिसळ सेंटर, पावभाजी व अंडाभुर्जी व्‍यावसायिकांकडून होत असते. तर साधारणतः वीस टक्‍के पाव हे किरकोळ बाजारातून खरेदी होत असल्‍याचा अंदाज आहे.

हेही वाचा: Nashik : रुग्णवाहिका चालक, डॉक्टरांची हेळसांड; विश्रांतीसाठी रूम देण्यास टाळाटाळ