बीड : ऊस पेटवून देत बीडमध्ये 'शेतकऱ्याची आत्महत्या' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Farmer commits suicide

बीड : ऊस पेटवून देत बीडमध्ये 'शेतकऱ्याची आत्महत्या'

गेवराई : राज्यातील अतिरिक्त उसाच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले असून मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने ऊस पेटवून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यंदा अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची चाहूल वर्षभरापूर्वीच लागली होती. मात्र, सरकारने गाळपाच्या नियोजनासाठी कुठलेही ठोस उपाय केले नाहीत. उसाचे गाळप होत नसल्याने एका शेतकऱ्याने शेतातील ऊस पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना हिंगणगाव (ता. गेवराई) येथे बुधवारी दुपारी घडली. नामदेव आसाराम जाधव (वय ३०) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

बीड जिल्ह्यात यंदाच्या हंगामात जिल्ह्यात चार सहकारी आणि दोन खासगी सहकारी साखर कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. अद्यापही या सर्व कारखान्यांचे गाळप सुरू आहे. दरम्यान, अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होण्याचा अंदाज वर्षभरापूर्वीच लागलेला असताना शासनस्तरावर कुठल्याही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे आजघडीला पाच लाख हेक्टरांहून अधिक क्षेत्रावर ऊस उभा आहे. आणखी फार तर पंधरवडा कारखान्यांचे गाळप सुरू राहील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा ऊस शेतात आहे त्यांचे नुकसान अटळ आहे. दरम्यान, हिंगणगाव (ता. गेवराई) येथील नामदेव जाधव यांचा दोन एकर क्षेत्रावर ऊस आहे. उसाचे गाळप होत नसल्याने ते हवालदिल होते. याच नैराश्यातून त्यांनी बुधवारी उसाचा फड पेटवून दिला आणि शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावला.

दरम्यान, हिंगणगाव येथील १०१ हेक्टरांवरील उसाची नोंद जय भवानी सहकारी साखर कारखान्याकडे होती. नोंद असलेला सर्व ऊस गाळप झाला आहे. येथीलच नोंद नसलेला २५ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप केला आहे. नामदेव जाधव यांचा नोंद नसलेला ऊसदेखील गाळपाचे नियोजन होते. गतवर्षी गंगामाई शुगर्स या कारखान्याला ऊस पाठविला होता. यंदा मात्र बाहेरच्या कारखान्यांनी ऊस नेला नसल्याची माहिती, जयभवानी कारखान्याच्या पत्रकात देण्यात आली.

वडगाव सुशी येथेही शेतकऱ्याची आत्महत्या

गेवराई तालुक्यातीलच वडगाव (सुशी) येथे कर्जामुळे एका पंचावन्नवर्षीय शेतकऱ्याने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. शिवदास नारायण नरवडे असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

Web Title: Beed Farmer Commits Suicide By Burning Sugarcane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top