
Mechanized Agriculture : यांत्रिकी शेतीचा फायदाच फायदा!; मजूर टंचाईवरही तोडगा
साकोरा (जि. नाशिक) : शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू होतो. खरिपाची पिके काढणीवर असतानाच उस तोडणीसाठी मजूर बाहेरगावी निघून जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची मजुरांअभावी मोठी तारांबळ उडते. यावर मात करण्यासाठी शेतकरी आता यांत्रिक शेतीकडे वळला आहे. यांत्रिक शेतीमुळे खर्च कमी, वेळेत पिकाची लागवड होते व उत्पन्नात वाढ होते. (benefit of mechanized agriculture is benefit Also solve labor shortage Nashik News)
उत्तर महाराष्ट्रात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस तयार झाल्यानंतर कापसाचे खोड मजुरांच्या मदतीने काढल्यास खर्चही होतो व वेळ जास्त लागतो. वेळ व मजूर खर्च वाचविण्यासाठी ट्रॅक्टर मोबाईल श्रेडरच्या सहाय्याने कपाशीची झाडे तोडून त्या झाडांची कुट्टी होत असते. कुट्टीचे सेंद्रिय खत होते. नंतर रोटावेटरने शेती तयार होते.
अवघ्या दोन दिवसांत रब्बी पीक लागते. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरणांतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा घेऊन यंत्र खरेदी करून वेळेत पिकाची लागवड केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. मजुरांअभावी कोणतेही काम थांबत नाही. शासनाच्या अनुदानाचा फायदा घेत आपले उत्पन्न कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कृषी यांत्रिकीकरणांतर्गत अनुदान
पंपसेट (७.५ एचपीपर्यंत) : निर्धारित किमतीच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये
ट्रॅक्टर (४० एचपी) : निर्धारित किमतीच्या २० टक्के अथवा जास्तीत जास्त ४५ हजार रुपये
ऊसतोडणी यंत्र : निर्धारित किमतीच्या ४० टक्के अथवा २० हजार रुपये
पावर थ्रेशर : निर्धारित किमतीच्या ४० टक्के अथवा जास्तीत जास्त २० हजार रुपये
विनिंगफॅन, चेफ कटर (मानवचलित) : निर्धारित किमतीच्या २५ टक्के अथवा जास्तीत जास्त २० हजार रुपये
ट्रॅक्टर फवारणी यंत्र : निर्धारित किमतीच्या २५ टक्के अथवा जास्तीत जास्त चार हजार रुपये
रोटावेटर : निर्धारित किमतीच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त ३० हजार रुपये
ट्रॅक्टर मोबाईल श्रेडर : निर्धारित किमतीच्या चाळीस ते पन्नास टक्के अनुदान
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

परिश्रमाने शेतकरी भागवतात भूक
सुखं सन्तोषवाचा यत् प्रशस्यं कल्पयामस्तम्
समेषामत्रभाजां सा कृषी : सुखलब्धे भूयात
ही आहे, पाठ्यपुस्तकातील कृषिविषयक संस्कृत कविता. अर्थात, आपल्या परिश्रमामुळे लोकांची भूक भागते हा शेतकऱ्यांचा आनंद आहे. अन्न ग्रहण करणाऱ्यांना खूश पाहून शेतकरी संतुष्ट होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट प्रशंसनीय आहे. त्यासाठी शेतकरी अन्नाचे उत्पादन घेतात.
"माझ्याकडे ३५ एकर बागायती क्षेत्र असून, १८ एकर कपाशी होती. कपाशीचे ताटे काढून मका लावण्यास अवघे पाच दिवस लागले. अनुदानावर मोबाईल श्रेडर, पॉवर टिलर, मका पेरणी यंत्र, रोटावेटर घेतल्याने माझा पैसा, वेळ व खर्चही वाचत आहे. उत्पन्नही चांगल्या प्रतीचे घेत आहे. सर्वच शेतकऱ्यांनी अनुदानाचा फायदा घेत यांत्रिक शेती करावी."
- तुषार सूर्यवंशी, प्रगतिशील शेतकरी, आमोदे