Nashik News : खबरदार! जनावरे मोकाट सोडाल तर...; मालकांवर होणार गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stray Animals

Nashik News : खबरदार! जनावरे मोकाट सोडाल तर...; मालकांवर होणार गुन्हे दाखल

नाशिक : शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्‌तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने अखेर पोलिसांनी मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोकाट जनावरांच्या मालकांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beware animals left free Cases filed against owners Nashik News)


शहरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत. जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. बहुतांशी उपनगरी रस्त्यांवर मोकाट जनावरांनी रस्ता अडविलेला असतो. ही परिस्थिती शहरातील बहुतांशी रस्त्यावर असते. यातून अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते.

याबाबत त्रस्त नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या. तक्रारीनुसार महापालिकेकडून कारवाईही केले जाते. मात्र, अलीकडे जनावरांचे कोंडवाडा राहिलेले नाहीत. गोशाळांमध्ये ही जनावरे जमा केल्यानंतर मालक तेथून ती सोडवून आणतात आणि पुन्हा ती जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात.

त्यामुळे वर्षानुवर्षं ही समस्या कायम आहे. मात्र, आता शहर पोलिसांनीच मोकाट जनावरांची ही समस्या गांभीर्याने घेतली आहे. तक्रार आल्यास ती दाखल करून त्या जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे जनावरांच्या मालकांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik News : घोटीत Railway Track बदलल्याने गोंधळ; वाहतूक ठप्प

पहिला गुन्हा दाखल

हिरावाडी भागात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. सम्राट गोकुलधाम बिल्डिंगसमोर अज्ञात मालकाने दोन गायी मोकाट सोडल्या. या गाईंमुळे सायंकाळी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच, रस्त्यावर मोकाट जनावरे सोडल्याने त्यांच्याही जीविताला धोका होता.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात कर्मचारी जयवंत लोणारे यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलिस व्हिडिओ व छायाचित्रासह गायीच्या मालकाचा शोध घेत आहेत.

"मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची होते. तसेच, नागरिकांच्याही जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे यापुढे मोकाट जनावरांमुळे समस्या निर्माण झाल्यास संबंधित मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत."- किरणकुमार चव्हाण, उपायुक्त, परिमंडळ-१, नाशिक.

हेही वाचा: Gram Panchayat Election Result: ZPच्या शाळेत पोषण आहार शिजवणाऱ्या स्वंयपाकी बनल्या लोकनियुक्त सरपंच!

टॅग्स :NashikcrimenmcCattle