esakal | तर मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राजीनामा द्यावा! भाजपचा शिवसेनेवर पलटवार

बोलून बातमी शोधा

Shivsena-Bjp
तर मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राजीनामा द्यावा! भाजपचा शिवसेनेवर पलटवार
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेला महापौर सतीश कुलकर्णी यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याबरोबरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला भाजपने उत्तर दिले आहे. मुळात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत महापौरांचा संबंध येत नाही. शिवसेना असे मानतं असेल तर यापूर्वी भंडारा रुग्णालय, तसेच वैद्यकीय सुविधेअभावी वर्षभरापासून दररोज हजारो मृत्युंची जबाबदारी घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राजीनामा दिला पाहीजे, अशी पुस्ती जोडत शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

दुर्घटनेवरून आता राजकीय चिखलफेक

डॉ. हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेवरून आता राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. शिवसेनेने भाजपच्या सत्ता असलेल्या महापालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या राजीनाम्याची तसेच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्याला सभागृह नेते सतीश सोनवणे व गटनेते जगदीश पाटील यांनी उत्तर दिले. संयुक्त पत्रकात म्हटले, की मुख्यमंत्री वांरवार राजकारण न करण्याचा सल्ला देत आहे. मात्र शिवसेनेचे नगरसेवक मात्र मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळत नाही. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापौरांचा राजीनामा घेवून मनुष्यवधाचा गुन्हा करावा, अशी मागणी केली आहे. तसे असेल तर वर्षभरापासून रोज हजारो रुग्णांचा वैद्यकीय सुविधा अभावी होणारे मृत्यू, भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग, नालासोपारा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी दगावलेले रुग्ण यासारख्या अनेक घटनांची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला हवा व त्याचवेळी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे क्रमप्राप्त होते.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

शिवसेनेच्या नेत्यांचे ठेके

दत्तक पित्याला माफी नाही हे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केलेले वक्तव्य अपरिपक्वतेचे उदाहरण आहे. पालिकेच्या अनेक ठेक्यांमध्ये शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याचा संबंध आहे, हे सांगण्याची गरज नाही. वाहनचालक, व्हॉलमन, पेस्ट कंट्रोल, सफाई व घंटागाडी कर्मचारी भरती, बुस्टर पंपिंगवरील मानधनावर भरती यात शिवसेनेच्या नेत्यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेने महापालिकेच्या कामकाजावर बोट ठेवण्यापेक्षा नगरविकास मंत्र्यांनी मानधनावरील पदांना मंजुरी आणण्याचे आवाहन करण्यात आले.

नगरसेविका गामणेंचा अभ्यास कमी

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची जबाबदारी स्वीकारून महापौर सतीश कुलकर्णी यांनी राजीनामा द्यावा व त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका किरण गामणे यांनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपने गामणे यांचा अभ्यास कमी असल्याची खिल्ली उडविली. जागतिक साथरोग असल्याने सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करताना महापालिका आयुक्तांची सक्षम प्रधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे गामणे यांचे वक्तव्य स्टंटबाजी असून, पक्षातील वरिष्ठांना खुश करण्यासाठी धडपड करणारे आहे. महापौराच्या कार्यकालाकडे लक्ष वेधून टायो निप्पॉन सन्सो इंडिया प्रा.लि. या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा