esakal | नाशिकमध्ये भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर
sakal

बोलून बातमी शोधा

bjp shivsena

भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिका प्रभाग समिती सभापतिपदासाठी पंचवटी, नाशिक रोड विभागात भारतीय जनता पक्षाच्या एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने विद्यमान आमदार ॲड. राहुल ढिकले व माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यातच टक्कर पाहायला मिळत आहे. पूर्व विभागात डॉ. दीपाली कुलकर्णी सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्‍चिम व सातपूरमध्ये मनसे व भाजपने एकमेकांना पाठिंबा देण्याच्या बोलीवर उमेदवारी अर्ज दाखल केले खरे, परंतु पश्‍चिममध्ये भाजप उमेदवाराला पाठिंबा मिळविण्यासाठी मनसेला त्यांच्याच नगरसेवकाच्या विनवण्या करण्याची वेळ आली आहे. (BJP-ShivSena-within-party-patch-Disputes-nashik-marathi-news)

पंचवटी, नाशिक रोडला भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर

मार्चमध्ये मुदत संपलेल्या प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुका कोरोनामुळे लांबणीवर पडल्या. त्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविल्यानंतर १९ जुलैला ऑनलाइन पद्धतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका घेण्याचे जाहीर करण्यात आले. अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. पंचवटी व नाशिक रोड प्रभाग समितीत भाजपमध्येच एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले, तर नाशिक रोडमध्ये शिवसेनेतील धुसफूस नगरसेवक रमेश धोंगडे यांच्या नाराजीतून बाहेर पडली.

पंचवटीत भाजपचीच कसोटी

सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपला एका नावावर एकमत करता आले नाही. माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांच्या नावाचा आग्रह सानप यांच्याकडून धरण्यात आल्याने भाजपमध्ये चलबिचल निर्माण झाली. गेल्या महिन्यात सभागृहनेता व गटनेता बदलात सानप यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने पूर्व विधानसभा मतदारसंघात सानप पुन्हा सक्रिय होत असल्याने सानप यांच्या विरोधातील गट पुन्हा सक्रिय झाला आहे. त्या अनुषंगाने रुची कुंभारकर, पूनम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. मतदानावेळी कोण माघार घेणार, यावर पंचवटी विभागाचे भविष्यातील राजकारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: पोलिसांच्या सतर्कतेमुळे थांबला अल्पवयीन मुलीचा साखरपुडा

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

नाशिक रोड विभागात सानपसमर्थक सुमन सातभाई यांनी अर्ज दाखल केल्यानंतर मीरा हांडगे यांनीही अर्ज दाखल केला. सातभाई सानप गटातून, तर हांडगे आमदार ढिकले यांच्या गटातील मानल्या जात असल्याने आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा उमेदवारीवरून पणाला लागली आहे. शिवसेनेकडून प्रशांत दिवे यांनीही अर्ज दाखल केला आहे. सत्यभामा गाडेकर यांच्या निधनामुळे शिवसेनेची जागा एकने घटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पवार यांचे मत मिळून समसमान पक्षीय बलाबल झाल्याने चिठ्ठी पद्धतीने मतदान होईल. त्यापूर्वी भाजपकडून एकाचा अर्ज मागे घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शिवसेनेचे रमेश धोंगडे यांना संधी न मिळाल्याने नाराजीतून शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: सिडकोत मनसेला सक्षम नेतृत्वाची गरज; ‘भोपळा’ फोडण्याचे आव्हान

पश्‍चिम, सातपूरला मनसेची कसोटी

पश्‍चिम प्रभाग समितीत महाविकास आघाडीचे बहुमत आहे. येथे मनसेच्या एका नगरसेवकाची भूमिका महत्त्वाची ठरते. मनसेचा पाठिंबा गृहीत धरून काँग्रेसच्या वत्सला खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी मनसेच्या वैशाली भोसले उपस्थित होत्या. पश्‍चिममध्ये मनसेचा पाठिंबा गृहीत धरून भाजपच्या योगेश हिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या बदल्यात सातपूर प्रभाग समितीत मनसेचे योगेश शेवरे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार आहे. मात्र, सातपूरमध्ये भाजपकडून अर्ज दाखल न झाल्याने नाइलाजाने का होईना मनसेच्या उमेदवाराला मतदान करण्याची वेळ येणार आहे. शिवसेनेकडून मधुकर जाधव यांनी सातपूरमधून अर्ज दाखल केला.

पूर्व, सिडकोत विजय निश्‍चित

पूर्व प्रभाग समितीत भाजपकडे बहुमत असल्याने डॉ. दीपाली कुलकर्णी यांचा विजय निश्‍चित आहे. सिडकोत शिवसेनेचे बहुमत असल्याने सुवर्णा मटाले यांचा विजय निश्‍चित आहे. मात्र भाजपच्या छाया देवांग यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक अटळ आहे.

हेही वाचा: लोकरी माव्यामुळे उस कडवट; निफाड तालुक्यातील शेतकरी हवालदिल

loading image