Nashik News: रिक्त पदांच्या भरतीसाठी बोगस जाहिरात! अद्याप भरती नसल्याचा NMCत प्रशासनाकडून खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest News

Nashik News: रिक्त पदांच्या भरतीसाठी बोगस जाहिरात! अद्याप भरती नसल्याचा NMCत प्रशासनाकडून खुलासा

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकर भरतीसाठी अर्ज मागविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

यासंदर्भात महापालिका प्रशासनाने कानावर आत ठेवताना, अशी कुठल्याही प्रकारची भरती महापालिकेच्या माध्यमातून होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. (Bogus advertisement for recruitment of vacancies Disclosure from NMC administration no recruitment yet Nashik News)

हेही वाचा: Grapes Season : जिल्ह्यातील द्राक्षहंगामाचा श्रीगणेशा! फेब्रुवारीत गती येणार

महापालिकेच्या आस्थापनेवर जवळपास २८०० पदे रिक्त आहे. त्या व्यतिरिक्त महापालिका ‘ब’ वर्गाच्या दर्जात समाविष्ट झाल्याने त्यानुसार जवळपास १४ हजार पदांचा आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. परंतु, शासनाच्या नवीन नियमानुसार आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असेल तर रिक्त पदे भरता येत नाही.

त्यानुसार नाशिक महापालिकेचा आस्थापना खर्च जवळपास ४२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. जोपर्यंत पस्तीस टक्के परत खर्च येत नाही, तोपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे. परंतु, मागील दोन वर्षात राज्यात कोरोनाचा सामना करताना मनुष्यबळाची कमतरता भासली.

त्यामुळे राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय या दोन प्रमुख विभागांचे रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. परंतु सेवा प्रवेश नियमावलीचा महापालिकेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने नोकर भरती होऊ शकली नाही. शासनाच्या सूचनेनुसार अग्निशमन विभागातील ३४८ व वैद्यकीय विभागातील ३५८ या एकूण ७०६ पदांसाठी सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देण्यात आली.

त्यानंतर राज्य शासनाने रिक्त पदांची भरती करण्यासाठी टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांची नियुक्ती करण्याचे आदेश काढले. त्यानुसार महापालिकेला आयबीपीएस या संस्थेचा प्रस्ताव प्राप्त झाला.

आयबीपीएस या संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्याची तयारी प्रशासनाकडून केली असतानाच पदवीधर मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नोकर भरतीवरदेखील मर्यादा आल्या आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Police Felicitation : राज्यातील 31 अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्यपदक जाहीर

‘ॲप’च्या माध्यमातून फसवणूक

आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सामंजस्य करार होऊन नोकर भरतीची पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. मात्र, सोशल मिडियाच्या माध्यमातून बेरोजगारांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

यात महापालिकेत दोन हजार रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी ठराविक लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन करून ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जात आहे. ॲप डाऊनलोड करताना ओटीपी तसेच खासगी माहिती विचारली जात असल्याने यातून बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

"पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू असल्याने नोकर भरती करता येत नाही. महापालिकेने आयबीपीएस संस्थेमार्फत वैद्यकीय व अग्निशमन विभागातील पदे भरण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप संस्थेसोबत करार झालेला नाही. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रक्रिया पार पडेल. बोगस भरती किंवा अन्य भूलथापांना बळी पडू नये."

- मनोज घोडे- पाटील, उपायुक्त, प्रशासन महापालिका.

हेही वाचा: President's Gallantry Award : निफाडच्या भूमिपुत्राने पटकावला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

टॅग्स :NashikRecruitmentnmc