esakal | थरारक 13 तास! बापाच्या डोळ्यादेखत लेकाचा मृत्यूतांडव; अग्निशमन दलाचे जवानही खिन्न
sakal

बोलून बातमी शोधा

drown

बापाच्या डोळ्यादेखत लेकाच्या मृत्यूतांडव; थरारक 13 तास

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि.नाशिक) : महापालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल १३ तास शोधमोहीम राबवली. पण ही मोहीम अपयशी ठरली आणि परिसरात एकच शोककळा पसरली...यावेळी बापाच्या मन हेलावणाऱ्या आक्रोशाने कुटुंबीयांसह अग्निशमन दलाचे जवानही खिन्न झाले..

दुर्देवी घटना...अग्निशमन दलाचे जवानही खिन्न

त्यादिवशी गिरणा नदीला पूरपाण्याचा जोर मोठा होता. गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी शहराजवळील टेहेरे शिवारातील गिरणा नदीपात्रातील भगवान वीर एकलव्य दंडनायक पुलाजवळ ही दुर्घटना घडली. बाप व चुलत्यासमवेत ट्रक धुण्यासाठी ११ वर्षीय चिमुकला नदीपात्रात उतरला. पण...बाप व चुलत्याच्या डोळ्यादेखत हा थरार घडला. सौरभ अविनाश बच्छाव असे चिमुकल्याचे नाव आहे. गिरणा नदीला पूर आल्याने एकलव्य पुलाखाली असलेल्या फरशीपुलावर टेहेरे-सोयगाव शिवारातील अनेक जण नदीकाठावर वाहने व गोधड्या धुण्यासाठी मोठी गर्दी करतात. अविनाश बच्छाव (रा. टेहेरे) मुलगा सौरभ व भावासह नदीकाठावर ट्रक धुण्यासाठी गेले. ट्रक धूत असतानाच दोघांच्या डोळ्यादेखत सौरभ पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. चुलत्याला पोहता येत नसताना त्यांनी नदीत उडी मारली. पाठोपाठ बापानेही उडी मारली. बच्छाव यांनी भावाला पोहण्यास प्रतिबंध करत काठावर नेले. मात्र, पूरपाण्याचा जोर असल्याने मुलाला वाचविण्यात ते अपयशी ठरले. सौरभच्या घरी शोकाकुल वातावरण आहे.

हेही वाचा: अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा; कारवाई तुर्तास टळली!

१३ तास शोधमोहीम राबवूनही अपयशी

या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या आठ ते दहा जवानांनी गुरुवारी सायंकाळी एक तास व शुक्रवारी सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसहा असा एकूण १३ तास नदीपात्रात सौरभचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहीम अपयशी ठरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रारंभी टेहेरे पूल ते गिरणा केटीवेअर नंतर गिरणा केटीवेअर पूल ते मडकी महादेव यादरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतरात नदीपात्रात शोध घेतला. तथापि, सौरभचा मृतदेह हाती लागला नाही, असे अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. मनपा अग्निशमन दल व पोलिसांनी दुर्घटनेची नोंद केली आहे. मोहीम अपयशी ठरल्याने कुटुंबीयांसह अग्निशमन दलाचे जवानही खिन्न झाले

हेही वाचा: पावसामुळे कर्ज फेडायचं कसं या चिंतेतून शेतकरी महिलेची आत्महत्या

loading image
go to top