
नाशिक : गेल्या दोन दिवसांतील जोरदार पावसामुळे सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा झाला नाही. हे पाणी सराफ बाजार परिसरासह दहीपुलावरील अनेक दुकानांमध्ये शिरून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. या प्रश्नावर स्मार्टसिटीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी (ता. 16) नुकसानग्रस्त व्यावसायिकांना दिली.
2008 मधल्या परिस्थितीची आठवण
सोमवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसानंतर पावसासह भूमिगत गटारींचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजार, दहीपुल भागातील दुकानांमध्ये शिरून व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला. या नुकसानीची पाहणी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केली. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, महापालिका विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहाय्यक पोलिस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पोलिस निरीक्षक हेमंत सोमवंशी, नगरसेवक गजानन शेलार, रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. व्यावसायिकांशी संपर्क साधताना श्री. भुजबळ यांनी 2008 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याची आठवण सांगितली. सखल असल्यामुळे अलीकडच्या काळात या भागात पावसामुळे नियमितपणे पाणी साचत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. या वेळी व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले.
...पण कोरोनाचे अस्तित्व शिल्लक
शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, त्यावर प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी स्वत: जागृत राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच पालकमंत्र्यांनी स्वत:च्या आरोग्याची सुरक्षा प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगितले. लॉकडाउन जरी शिथिल झाला असला, तरी कोरोना अजून संपलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अगदी गरज असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण फिरणे, गर्दी करणे टाळावे, प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर कटाक्षाने करावा, असा सल्ला दिला. पोलिस यंत्रणेने मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जरी असली, तरी ती एक ठराविक संख्येपर्यंत वाढून नंतर हा वाढता आलेख आपोआपच खाली येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.