‘बीव्हीजी’ला महिनाभराचे पेमेंट अदा
(उपशीर्षक)
सुधारणा करण्यासाठी संधी; वाहने वाढविण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २२ : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. अशात स्वच्छतेचा कंत्राट असलेल्या बीव्हीजी कंपनीचे मार्च महिन्यापासून पेमेंट रोखण्यात आले होते. मात्र, शहरातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि आयुक्तांनी सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला पुन्हा एक संधी देत महापालिकेने बीव्हीजी कंपनीला एक महिन्याचे पेमेंट अदा केले आहे.
महापालिका महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्यात स्वच्छतेच्या प्रश्नावर बैठक झाली. बैठकीत बीव्हीजीच्या कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कंपनीची आर्थिक अडचण लक्षात घेऊन एक महिन्याचे थकीत पेमेंट अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्चपासून थकीत असलेल्या देयकांपैकी एक महिन्याचे पेमेंट अदा झाल्याने बीव्हीजी कंपनीला काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न सुटावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट
बंद वाहने दुरुस्त करा, ट्रॅक्टर वाढवा
कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बंद पडलेली वाहने तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या. तसेच कचरा वाहतुकीसाठी ट्रॅक्टरची संख्या वाढविणे, घंटागाड्यांच्या फेऱ्या नियमित करणे आणि प्रत्येक भागातील कचरा वेळेत उचलण्यावर भर देण्यास सांगण्यात आले. दिवाळी पूर्वी साचलेला कचरा तातडीने उचलून नियमित साफसफाई करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले.