महिलांसाठी प्रेरणादायी बनल्या रेल्वेस्थानकावरील कुली इंदूताई वाघ | motivational story Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदूताई वाघ

महिलांसाठी प्रेरणादायी बनल्या रेल्वेस्थानकावरील कुली इंदूताई वाघ

अमिताभ बच्चन यांच्या कुली या चित्रपटाच्या निमित्ताने कष्टमय आयुष्याला प्रामाणिकतेची जोड देत हमालांची ओळख अधोरेखित केली. मात्र कुली म्हणून आयुष्य जगताना महिलाही या क्षेत्रात मागे नाहीत. कष्टाची कामे करत आलेल्या संकटांना आत्मविश्वासातून परतवून लावत नाशिक रोड रेल्वेस्थानकात कुली म्हणून कष्टाची कामे करतानाच या क्षेत्रात ओळख उभी केलीय ती चाडेगावच्या इंदूताई वाघ यांनी..!

हेही वाचा: कोरोनामुळे पतीचे निधन, तरी ‘ती’ने मिळविले यश

जन्माला येताना नशिबात असलेल्या कष्टातून महिलांपासून दूर असलेल्या हमालीकामाचा कसलाही कमीपणा न मानता या क्षेत्रात ओळख उभी केलेल्या इंदूताई यांचे माहेर नाशिकजवळच असलेल्या चाडेगावचे, तर सासर सिन्नर तालुक्यातील पांढुर्लीजवळील शिवडी येथील... इंदूताईंचे शिक्षण जेमतेम सातवी... वडील पांडुरंग कचरू मानकर व गीताबाई यांचे दोघांसह सात मुलींचे खटल्याचे कुटुंब... अल्पजमिनीत कुटुंबाची गुजराण करणे शक्य नसताना संपूर्ण कुटुंबच शेतमजूर म्हणून काम करत होते.

नाशिक रोड रेल्वेस्थानकापासून जवळच असलेल्या चाडेगाव येथून पांडुरंग मानकर यांनी कुली म्हणून कामाला सुरवात करीत संसाराचा रहाटगाडा पुढे नेला. इंदूताई यांच्या सासरी पती एकनाथ वाघ यांचीही परिस्थिती जेमतेम. विवाहवेदीवर भविष्यातील सुखाची स्वप्ने बघत असतानाच लग्नाला अवघा दहा महिन्यांचा कालावधी झालेला असतानाच एका दुर्घटनेत नियतीने पतीचे छत्र हिरावून नेले. तेव्हा इंदूताई गर्भवती होत्या. अशाही परिस्थितीत खचून न जाता पतीने दिलेली ओळख भक्कम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या गावातच शिवणकाम शिकल्या. शिवणकामानिमित्त रोजगार शोधत इंदूताई यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. कुटुंबात सूरजच्या निमित्ताने बाळाने जन्म घेतला. मुलाला आणि आई-वडिलांना आधार देण्यासाठी कुटुंबातील मुलाची भूमिका इंदूताई यांनी निभावली.

हेही वाचा: नियतीवर मात करत उभ्या राहिल्या खिराडच्या भारती गावित

कुली म्हणून राहिल्या उभ्या

कुटुंबाचा गाडा पुढे नेणाऱ्या वडील पांडुरंग मानकर यांचे या काळात छत्र हरपल्याने मात्र पुन्हा कुटुंबाच्या दुःखाची वाट समोर आली. मात्र आई गीताबाई, मुलगा सूरज यांच्यासह कुटुंबातील सदस्यांसाठी इंदूताई यांनी दिलेला आधार मोलाचा होता. या काळात इंदूताई यांचे घुगे परिवारातील चारही मामांनी कुटुंबासाठी उभी केलेली आधाराची फळी भक्कम होती. आयुष्यात कष्टाला न घाबरता वडिलांच्या जागी कुली म्हणून रेल्वे विभागाकडून मान्यता मिळवत नाशिक रोड रेल्वेस्थानकात त्या कुली म्हणून कष्टाची कामे करत असतानाच चार वर्षांपासून उभ्या राहिल्या आहेत.

माणुसकी जिवंत आहे...

रेल्वेस्थानकात महिला कुली म्हणून काम करणे तसे अवघड. मात्र नाशिक रोड रेल्वेस्थानकात कुली म्हणून काम करत असतानाच सहकारी कुली प्रकाश बोडके, रवी साळवे, संतोष बरके, वसंत मानकर, समाधान पाटील, संतोष तुरवणे, शरद बिन्नर या कुलींचा बहीण म्हणून मिळणारा आधार आणि पाठिंबा खूप मोलाचा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. अनेकदा रेल्वेस्थानकाची माहिती नसलेल्या, गावाकडून वाट चुकलेल्या महिला तसेच प्रवाशांना आधार देताना, योग्य मार्गदर्शन करताना समाजासाठी काहीतरी केल्याचे समाधान नक्कीच मिळते, हेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

Web Title: Chadegaon Indutai Wagh Working As Coolie In Nashik Road Railway Station In Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..