

मालेगाव : नवरात्रोत्सवामुळे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे देवीच्या काकड आरतीपासून रात्री उशिरापर्यंतच्या गरबा नृत्यामुळे गजबज वाढली आहे.
नवरात्रोत्सवातील चक्रपुजेला गुरूवारी (ता.२०) पाचव्या माळेपासून सुरुवात होत आहे. कसमादेत ‘अग्या हो विसरग्या हो’चा गजर ऐकायला मिळेल.
दरम्यान यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली तरी नवरात्रोत्सवात कोठेही त्याचा परिणाम दिसून येत नाही. घराघरात होणाऱ्या चक्रपुजेची जय्यत तयारी सुरू आहे. (Chakrapujas start tomorrow in Kasmade There excitement in village preparations for victory underway Navratri Festival 2023 Nashik)
नवरात्रोत्सवात चक्रपुजेला मोठे महत्त्व आहे. पुरणपोळीसह विविध पदार्थांचा नैवेद्य पूजेसाठी केला जातो. ‘अग्या हो विसरग्या हो’ म्हणत प्रत्येकी अकरा या प्रमाणे सर्व पदार्थ पूजेसाठी मांडले जातात. पाच गोलाकार तांदळाचे चक्र तयार केले जाते.
पूर्व बाजूला हरभरा डाळीचे बाहुले मांडले जाते. पश्चिमेला पिठाचे, उत्तरेला रक्षेचे तर दक्षिण बाजूला उडीद डाळीचे बाहुले तयार केले जातात. पाचही तांदूळ चक्रांवर पुरणपोळीसह सर्व नैवेद्य ठेवला जातो.
प्रत्येक नैवेद्यावर एक या प्रमाणे अकरा दिवे मांडले जातात. मध्यभागी भातावर मोठा दिवा (मेढ्या) ठेवला जातो. घटस्थापनेजवळील दीपमाळेतून ज्योत प्रज्वलित करून मोठ्या दिव्याबरोबरच इतर दिवे प्रज्वलित केले जातात. यानंतर सप्तशृंगी मातेचा जयजयकार करत देवीची आरती केली जाते.
चक्रपूजेच्या दिव्यांनी घरात प्रकाश पडतो. हा प्रकाश घरात कायमस्वरूपी राहू दे, घरातील तसेच आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊ दे, सुखशांती लाभू दे अशी प्रार्थना भगवतीला केली जाते.
कसमादेत बहुसंख्य कुटुंबीय वर्षाआड चक्रपूजा करतात. पाचव्या माळेपासून पूजेला प्रारंभ होतो. सातव्या व नवव्या माळेला चक्रपुजा होते. पिंपळगाव, उमराणे, दाभाडी, झोडगे आदी गावांमध्ये भाऊबंदकी मोठी असल्याने एकाच दिवशी शेकडो कुटुंबीयांकडे चक्रपुजा असते.
तालुक्यासह कसमादेत या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र या परिस्थितीचा परिणाम कोठेही दिसून येत नाही. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव देखील धूमधडाक्यात साजरा होत आहे.
चक्रपूजेसाठी नातेवाईक व मित्र परिवाराला आमंत्रित करण्याचे नियोजन केले जात आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेली चक्रपुजेची प्रथा अधिकच दृढ होत आहे.
काही कारणांमुळे नवरात्रोत्सवात चक्रपुजा करता आला नाही तर असे कुटुंबीय दिवाळीच्या सुमारास नरक चतुर्दशीला चक्रपुजेचा कार्यक्रम करीत असतात.
नैवेद्य घरूनच करण्यावर भर
कसमादेसह खानदेशमधील अनेक कुटुंबीय सप्तशृंगगडासह विविध देवी मंदिरांमध्ये चक्रपुजा करतात. सप्तशृंगगड, चांदवडची रेणुकादेवी, म्हसदीची धनदाई देवी आदी ठिकाणी पहिल्या माळेपासूनच श्रद्धाळू चक्रपुजेसाठी गर्दी करतात.
बहुतेक कुटुंबीय पूजा साहित्य व चक्रपुजेसाठी लागणारा नैवेद्य घरूनच तयार करून घेऊन जातात. विविध देवस्थानांच्या मंदिर परिसरात चक्रपुजेची रेलचेल सुरु आहे.
चक्रपुजेबरोबरच देवदर्शनाचा लाभ होत असल्याने कुटुंबीय व नातेवाईक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. संपूर्ण खानदेशमधून शेकडो कुटुंबीय सप्तशृंगगडावर जागा मिळेल तेथे चक्रपूजा करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.