esakal | ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; माजी मंत्री बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

chandrashekhar bavankule

ओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण व्यपगत केले, त्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आरक्षण व्यपगत करण्यामागचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रभारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा ईशाराही त्यांनी या वेळी दिला. (chandrashekhar-Bavankule-warning-and-Allegations-against-mahavikas-aaghadi-jpd93)

माजी मंत्री बावनकुळे यांचा इशारा; महाआघाडी सरकारवर आरोप

भाजयुमोच्या नाशिक शहराचा संघटनात्मक आढावा घेण्यासाठी श्री. बावनकुळे मंगळवारी (ता. २०) नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ओबीसी आरक्षणाबाबत ते म्हणाले, उच्च न्यायालयात भाजप सरकारने योग्य मांडणी केल्याने ओबीसींच्या बाजूने निकाल लागला. या विरोधात काँग्रेस नेते सर्वोच्च न्यायालयात गेले. जुलै २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढून ते टिकवले. मात्र महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू न मांडल्याने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश व्यपगत झाला. राज्य सरकारने इम्पिरिअल डाटा तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. परंतु विधी मंडळाचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारने डाटा द्यावा, असा ठराव केला. या मागे मुख्यमंत्र्यांसह झारीतील शुक्राचार्य आहे. आघाडी सरकारला डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नाही. परंतु आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार बोलतात, छगन भुजबळ मोर्चे काढतात. मात्र मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काहीच बोलत नाहीत. ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ यांनी पुढाकार घेतल्यास भाजप त्यांना मदत करेल, असे सुचवितानाच इम्पिरिअल डाटा नव्याने तयार करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली.

युवा शक्ती एकत्र करणार

राज्यातील युवकांपुढे अनेक गंभीर समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी युवाशक्ती संघटित केली जाणार आहे. राज्यात भाजयुमोच्या माध्यमातून २५ लाख युवकांची ‘युवा वॉरियर्स’ म्हणून नोंदणी करून डिसेंबर २०२१ अखेर त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बांधणी केली जाईल. केंद्र सरकारच्या युवकांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवून स्वावलंबी करणार असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, शहराध्यक्ष मनीष बागूल, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

हेही वाचा: डाळींचे चढे भाव कोरोनाकाळात टिकून! व्यापाऱ्यांची नाराजी

loading image