esakal | कुल्फी विकणारा बनला 'पैठणी उद्योजक'! 20 हजारापासून सुरूवात; आज 6 हातमाग युनिट
sakal

बोलून बातमी शोधा

paithni

कुल्फी विकणारा बनला पैठणी उद्योजक! जामदारीची पैठणी चेन्नईला

sakal_logo
By
भगवान हिरे

साकोरा (जि.नाशिक) : दारोदार कुल्फी विकणारे हात आता तलम रेशमी धाग्यांनी पैठणी विणू लागले आहेत. या हातांनी विणलेल्या पैठणीला देशभरातून मागणी वाढू लागली आहे. एवढ्यापुरती ही बाब थांबत नाही. पैठणीला लागणाऱ्या रेशीमचा कच्चा मालदेखील नांदगाव तालुक्यात उत्पादित होऊ लागला आहे. कधीकाळी दुष्काळाचा शाप भाळावर मिरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या तिसऱ्या पिढीतील युवा उद्योजक शेतकऱ्यांच्या मेहनतीला येणारा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याची ही नांदीच म्हणावी लागेल. (Kulfi-seller-became-Paithani-entrepreneur-marathi-news-jpd93)

जामदारीची पैठणी चेन्नईला

जामदरी येथील कृष्णा सूर्यवंशी यांच्यासह साकोरा येथील चेतन पाटील, अनिल हिरे, सावरगाव येथील दत्तू शेलार, घाटगेवाडी येथील सतीश मढे, माणिकपुंज येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदर राजेंद्र मोहिते अशी या प्रयोगशील शेतकऱ्यांची वानगीदाखल नावे. या सर्वांनी आपापल्या शेतात तुती लागवडीचा यशस्वी प्रयोग सुरू केला आहे. विशेष म्हणजे, आता हा प्रयोग फळाला आला आहे. यापैकी कृष्णा सूर्यवंशी यांच्या प्रयोगशीलतेने तर पुढचे पाऊल टाकले. कधीकाळी लोकांच्या दारोदार जाऊन कुल्फी विकण्याचे काम करणारे कृष्णा आज आकर्षक व नजाकतपूर्ण पैठणी विणू लागले आहेत. बारावी पास झाल्यानंतर कृष्णा नाशिक येथे कंपनीत कामाला लागला. ते काम करत असताना एका मित्राच्या मदतीने येवला येथे येऊन पैठणी विणकामची शिकवण घेऊ लागला. एकवेळचे जेवण मिळत नसतानही त्याने हार न मानता विणकाम अवगत केले. त्या विणकामच्या जोरावर आपल्या मूळगावी जामदरी येथे येऊन घरीच हातमाग यंत्र बनवून २० हजार रुपये भांडवल टाकून व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याजवळ सहा हातमाग युनिट असून, दहा कामगार काम करीत आहेत. त्यांच्या प्रांजल उद्योजकाची पैठणी चेन्नई, मुंबई, पुणे येथे जात आहे.

नांदगाव तालुक्यातील शेतीत रेशीम

या उद्योगाला लागणाऱ्या कच्चा माल रेशीम कोषसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेत तालुक्यात बारा ते चौदा एकरावर तुतीची लागवड करून रेशीम कोषचे चार युनिट सुरू केले. उद्योजक कृष्णा तालुक्यातील कृषी अधिकारी व रेशीम कोष उत्पादक चेतन पाटील, अनिल हिरे यांना बरोबर घेऊन तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. या रेशीम कोष उद्योगाला शासनाने शेतीसंलग्न विभाग म्हणून रेशीम विभागाच्या सहाय्याने एकरी तीन लाख शेड व तुती लागवडीसाठी मिळतात.

तलम पैठणीसाठी लागणारे रेशीम कोष नांदगाव तालुक्यात उत्तम बनते. त्यासाठी हवामान पोषक आहे. तालुक्यात दोन वर्षांपासून रेशीम कोषचे उत्पन्न चांगल्या प्रकारे येत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळून चांगले उत्पादन घ्यावे. -कृष्णा सूर्यवंशी, पैठणी उद्योजक, जामदरी

जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही रेशीम कोष उत्पादन व्यवसायाकडे वळावे. एकरी एका महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये खर्च वजा जाता नोकरदाराप्रमाणे महिन्याकाठी आपल्याला पैसे मिळतात. तुतीची एकावेळी लागवड केल्यास पंधरा वर्षे लागवड करण्याची गरज नसते. कोणत्याही प्रकारची फवारणी करण्याची गरज नाही. कमी जागेत व कमी खर्चात, कमी वेळेत किफायतशीर असा जोडधंदा मिळतो. -चेतन पाटील, सारताळे (साकोरा)

हेही वाचा: आरती केली मंत्र्यांनी; गुन्‍हा मात्र कार्यकर्त्यांवर

जामदरीत तयार होणाऱ्या पैठणीचा तपशील

- ब्रोकेट पैठणी

- डबल पदर पैठणी

- लोटस पाच पाकळी पैठणी

- मोर, पोपट ब्रोकेट पैठणी

- ओल, ओहर ब्रोकेट पैठणी

- हाप ओल, ओहर ब्रोकेट पैठणी

हेही वाचा: महिंद्राने परत मागविली नाशिकमध्ये तयार झालेली ६०० वाहने

loading image