esakal | नाशिकमध्ये निर्बंध जैसे थे, लग्न सोहळ्यात मास्कसह थर्मामीटरही सक्तीचे
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal

नाशिकमध्ये विवाहात मास्क, सॅनिटायझरसोबत थर्मामीटर सक्तीचे

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : शहर-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर घटत असला, तरी ग्रामीण भागात मात्र प्रादुर्भाव कमी होत नाही. त्यामुळे संसर्ग दर १.२२ टक्का इतका घटला असला, तरी लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. दुकानाच्या वेळाही वाढविल्या जाणार नसल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढाव्याची साप्ताहिक बैठक शुक्रवारी (ता. ९) झाली. त्यानंतर भुजबळ बोलत होते. (Chhagan Bhujbal informed masks sanitizers and thermometers are mandatory at weddings in nashik)


कामगारांच्या लसीकरणाच्या सूचना

भुजबळ म्हणाले, की तिसऱ्या लाटेच्या तोंडावर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योग, कंपन्या सुरू राहण्यासाठी त्यांना लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. उद्योजकांनी कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. त्यांच्या राहण्याची, प्रवासाची व्यवस्था करावी. या सर्व गोष्टींचे नियोजन उद्योजकांनी केले आहे किंवा कसे, याबाबतची जबाबदारी प्रादेशिक व्यवस्थापकांवर निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मंजूर करण्यात आलेले सर्व ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीने सुरू करावेत. मोठ्या स्वरूपातील उद्योग व संस्था हे सामाजिक दायित्व (सीएसआर) म्हणून निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन करावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या.

हेही वाचा: नाशिकमध्ये तुटवड्यामुळे सार्वजनिक लसीकरण ठप्पथर्मामीटरची सक्ती

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढलेली आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामीणस्तरावर काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांच्या मदतीने नियोजन करावे. ग्रामीण भागात लग्नसोहळ्यांना परवानगी देताना उपस्थितांच्या संख्येचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासणीसह त्यांना मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. लसीकरण वाढविण्यासाठी नियोजन करण्यात यावे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा, त्यातून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, अशाही सूचना दिल्या.


महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, नीलेश श्रींगी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा: प्रयोगशील शेतकऱ्याच्या पाठीवर कृषिमंत्र्यांची कौतुकाची थाप!

loading image