esakal | नाशिकमध्ये सार्वजनिक लसीकरण ठप्प; ज्येष्ठांबरोबरच तरुणाई हतबल
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

नाशिकमध्ये तुटवड्यामुळे सार्वजनिक लसीकरण ठप्प

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि. नाशिक) : स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर जागोजागी लसीकरण केंद्रे सुरू झाली खरी, परंतु लशींच्या तुटवड्यामुळे सार्वजनिक लसीकरण ठप्प झाले आहे. त्यामुळे अद्यापही पहिलाही डोस न घेतलेल्या ज्येष्ठांसह तरुणाईने ‘कोणी लस देता लस,’ अशी विनवणी केली आहे. खासगी रुग्णालयात लशीची उपलब्धता होते, मग सार्वजनिक ठिकाणीच तुटवडा कसा, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. (vaccination of corona in public places has been stoppeddue to shortage of vaccines in nashik)

शहरात सुरवातीला काही मोजक्याच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू होते. त्या ठिकाणी गर्दी होत असली तरी उशिरा का होईना, लस मिळेलच याची खात्री होती. कालांतराने नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात व्यवस्था करण्यासाठी महापालिका आरोग्याधिकाऱ्यांशी संपर्क साधत स्थानिक ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली; परंतु वाढलेल्या केंद्रांच्या प्रमाणात लशींची उपलब्ध झाली नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंगही उद्‍भवत आहेत.

हेही वाचा: ग्रामीण भागातील कोरोना थांबता थांबेना; रोजच पाच ते दहा बाधित

केवळ शंभर ते दीडशे डोस

लसीकरणाच्या सुरवातीच्या टप्प्यात महापालिका रुग्णालयातच लस उपलब्ध होती. कालांतराने नगरसेवकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधत आपल्या प्रभागात लसीकरण केंद्राची मागणी केली. त्यामुळे आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नांदूर याशिवाय अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित झाली. या ठिकाणी लस घेण्यासाठी मोठी गर्दी उसळू लागली. मात्र, गर्दी चारशेची व लस मात्र शंभर ते दीडशे डोस इतकीच उपलब्ध होत असल्यामुळे अद्यापही अनेक जण लसीकरणापासून दूरच आहेत.

प्रतीक्षायादी वाढतेय

लसीकरणासाठी एका केंद्राला सर्वसाधारण शंभर ते दीडशे लशी दिल्या जात आहेत. मात्र, भल्या पहाटेपासून यासाठी नंबर लावणाऱ्यांची यादी मात्र वाढतच आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंगही येत आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी लसीकरण सुरू राहणार की नाही याबाबत आदल्या दिवशी सायंकाळी माहिती मिळते. एकीकडे नागरिकांचा रेटा अन् दुसरीकडे कमी लशींची उपलब्धता यामुळे केंद्राची मागणी करणारेही हतबल झाले आहेत.

हेही वाचा: प्रयोगशील शेतकऱ्याच्या पाठीवर कृषिमंत्र्यांची कौतुकाची थाप!

वशिलेबाजीमुळे हतबल

सुरवातीच्या काळात मोजक्याच ठिकाणी सुरू असलेल्या लसीकरणाबाबत फारशा तक्रारी नव्हत्या; परंतु वाढलेल्या केंद्रामुळे म्हणा किंवा अन्य कारणांनी लसीकरणास खीळ बसली आहे. लसीकरणासाठी भल्या पहाटेपासून प्रामाणिकपणे रांगा लावलेल्या नागरिकांना टोकन मिळाल्यानंतरही लस न घेताच परत फिरावे लागत आहे. काही ठिकाणी नगरसेवकांच्या समर्थकांना किंवा परिचयातील नागरिकांचे मागील दाराने लसीकरण सुरू आहे, त्यामुळे ज्येष्ठांसह तरुणाईलाही मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे.

(vaccination of corona in public places has been stoppeddue to shortage of vaccines in nashik)

loading image