esakal | रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग हवा : छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Review Meeting

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग हवा : छगन भुजबळ

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने त्यांच्या स्वंतत्र कक्षासह उपचारासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये कोरोना निर्बंध पाळण्यासाठी समुपदेशन व प्रबोधन करून योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. भुजबळ यांनी जिल्ह्यातील खासदार-आमदार, महापौरांसह लोकप्रतिनिधीची बैठक घेत कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनाबाबत लोकभावना समजून घेतल्या. त्यात कोरोना नियंत्रणासाठी पूर्ण लॉकडाउन करण्यासह सुपर स्प्रेडर रोखण्यासाठी कडक उपाययोजनांबाबत लोकप्रतिनिधींनी सूचना मांडल्या. (Chhagan Bhujbal said that the participation of political leaders is needed to control Corona)

बैठकीनंतर भुजबळ म्हणाले, की कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणासाठी उपाययोजना करूनही रुग्ण वाढतच आहे. देशात-राज्यात सगळीकडेच हेच चित्र असल्याने सांगली तर इतर जिल्ह्याप्रमाणे पूर्ण लॉकडाउन करायचे का, याविषयी लोकप्रतिनिधींची भावना जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यामुळे ऑक्सिजनची सोय झाल्याशिवाय वाढीव रुग्णालयाला परवानगी दिली जाणार नाही. आदिवासी भागात लोकप्रबोधनासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून त्या कायमस्वरूपी उपलब्ध करण्यावर भर देऊन मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.

कृषिमंत्री भुसे म्हणाले, की पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तिप्पट आहे. बहुतांश नियम केंद्राकडून नियंत्रित होत असल्याने राज्य-जिल्हा यंत्रणेवर मर्यादा आहेत. प्राथमिक टप्प्यावरच रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शहरालगतच्या गावात प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक असल्याने पोलिस कारवाया वाढवाव्यात.

डॉ. भारती पवार (खासदार) : रुग्णावर क्वारंटाइनचे शिक्के मारले जात नाहीत. खेड्यात आरटी-पीसीआर टेस्ट केल्या जात नाहीत. पेठ-सुरगाण्यात लोकसंख्येच्या प्रमाणात कोविड बेड, पालिकांना कॉन्सट्रेटर मिळावेत.

हेमंत गोडसे (खासदार) : शहरातील बंद व्हेटिंलेटरचा आढावा घेतला जावा. रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या वितरणाचे निकष स्पष्ट करून वितरणात पारदर्शकता आणावी. तिसऱ्या लाटेच्या तोंडावर आतापासून सजगता दिसावी.

आमदारांच्या सूचना

दिलीप बोरसे : ताहाराबादला कोविड सेंटर सुरू करावे. आदिवासी भागात लसीविषयी गैरसमज असल्याने प्रबोधन केले जावे. आदिवासी भागात कोविड सेंटरची संख्या वाढवावी.

नरहरी झिरवाळ : आदिवासी भागात लोक रुग्णालयात जाणे टाळतात. लसीमुळे नंपुसकत्व येते, हा जनमाणसातील भ्रम दूर व्हावा. आदिवासी भागात गर्दी नियंत्रणावर लक्ष दिले जात नाही.

हिरामण खोसकर : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील गावांमध्ये लसीकरणाबाबत प्रबोधन व्हावे. प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण नाही. लसीशिवाय धान्य वितरण नाही, असे कडक नियम करा

सतीश कुलकर्णी (महापौर) : नागरिक मास्क व्यवस्थित लावत नाहीत. गृहविलगीकरणातील रुग्ण गंभीर नाहीत. मात्र मनस्थिती बिघडत असल्याने आणि भीतीने रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

ताहेरा शेख (महापौर, मालेगाव) : मालेगावला ऑक्सिजन प्लांट सुरू करावा. मालेगावला कोरोना टेस्टिंग लॅब आणि विद्युत शवदाहिनीची मालेगावला सोय केली जावी, लसीकरणाबाबत जनजागृती करावी.

सीमा हिरे : कोरोना नियंत्रणासाठी मार्निंग वॉकला गेल्यावर दंड होतो, औद्योगिक कामगारांच्या वाहानांवर नियंत्रण नाही. त्यामुळे आद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाउन सक्तीने लावले पाहिजे.

मौलाना मुफ्ती महंमद इस्माईल : लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी. लसीकरणानंतरही मृत्यू होतातच ही भीती आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासोबत लसीकरणाबाबत व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ भागात भुकंपाचे धक्के; नागरिकांत भीती

किशोर दराडे : लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीदरम्यान गावातील लोकांची अडचण होते. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी ऑफलाइन नावनोंदणीची सोय केली जावी.

दिलीप बनकर : कोरोनाच्या आकडेवारीत घोळ आहे. लसीकरणासाठी स्लॉट मिळत नाही. बाजार समित्या बंद ठेवल्यास शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार असल्याने बाजार समित्या वगळाव्यात.

डॉ. राहुल आहेर : उस्मानाबादच्या धर्तीवर साखर कारखान्यामार्फत ऑक्सिजननिर्मिती प्लांट सुरू कारावा. जिल्हा रुग्णालयांची बेडची संख्या वाढवावी. सिलिंडर विक्रेत्यांचे पैसे थकवू नये.

माणिकराव कोकाटे : गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल. लसीकरणासाठी शहरी लोक खेड्यात येत असल्याने गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढत आहे. तो नियंत्रित करावा.

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, महापौर सतीश कुलकर्णी, ताहेरा शेख (मालेगाव), जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल, नितीन पवार, हिरामण खोसकर, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा: धक्कादायक! ग्रामीण भागातील ३० मृतांसह नाशिकमध्ये कोरोनाचे ४२ बळी

loading image