भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार संभाजीराजे छत्रपती

नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळांची सदिच्छा भेट
भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार संभाजीराजे छत्रपती

नाशिक : छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा देशात अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींना आरक्षण दिले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची निर्मिती करून आरक्षण दिले. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केले. त्यांचे हे काम पुढे अविरत सुरू ठेवून बहुजन समाजाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी वंशज असलो, तरी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. श्री. भुजबळ त्यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे प्रतिपादन खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी (ता. ४) येथे केले.

बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी आम्ही एकमेकांना ताकद देऊ, असे श्री. भुजबळ यांनी आवर्जून सांगितले. संभाजीराजे छत्रपती यांनी श्री. भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, करण गायकर, योगेश निसाळ, विलास पांगरकर, समाधान जेजुरकर आदी उपस्थित होते.

श्री. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की नाशिकला झालेल्या मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या माध्यमातून श्री. भुजबळ यांची भेट झाली होती. त्या वेळी घरी येणार, असे मी त्यांना सांगितले होते. मात्र, अनेक दिवसांपासून भेट झाली नाही. नाशिकला कार्यक्रमानिमित्त आलो असता, त्यांची भेट घेतली. छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा ऋणानुबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. तसेच पिंपळगाव बसवंत येथील सत्यशोधक चळवळीत काम करणारे गणपतराव मोरे यांना त्यांच्या कामाबद्दल अधिक बळ दिले.

संयुक्त प्रयत्न करणार

छत्रपती शाहू महाराजांच्या ६ मेस स्मृती शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाबद्दल आमची चर्चा झाली. यानिमित्त छत्रपती शाहू महाराजांचे विचार जगात पोचविण्यासाठी ही संधी असून, त्यादृष्टीने आमच्याकडून संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येतील. या भेटीत बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी चर्चा झाली. श्री. भुजबळ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे छत्रपती शाहू महाराजांचे विचार तळागाळातील नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मराठा आणि ओबीसी कुठलाही वाद नाही. बहुजन समाजासाठी आपला लढा आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही श्री. संभाजीराजे यांनी सांगितले.

छगन भुजबळ म्हणाले...

  • खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र, अनेक दिवसांपासून भेट होऊ शकली नाही. आज त्यांची भेट झाली. याचा विशेष आनंद आहे.

  • संभाजीराजे छत्रपती यांच्याशी छत्रपती शाहू महाराजांविषयी खूप चर्चा झाली. छत्रपती शाहू महाराज आमचे देव असून, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर आम्ही काम करीत आहोत.

  • ६ मेच्या छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त वर्षभर अखिल भारतीय महात्मा फुल समता परिषदेतर्फे कार्यक्रम होतील. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात कार्यक्रम घेण्याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.

  • सत्यशोधक समाजाला छत्रपती शाहू महाराजांनी पाठबळ देत मदत केली. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे बहुजनांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला हवे. त्यादृष्टीने काम केले जाईल.

  • मराठा-ओबीसी असा कुठलाही वाद नसून ओबीसी आरक्षणास कुठल्याही लोकप्रतिनिधीने विरोध केला नाही. काही विघातक प्रवृत्ती केवळ निवडणुकीवेळेस ओबीसी-मराठा वाद पसरविण्याचा प्रयत्न करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com