esakal | मुख्यमंत्री ठाकरेंनी वाढविले झाकिर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य
sakal

बोलून बातमी शोधा

chief minister uddhav thackeray

पावसाळा व वादळवारे यादृष्टीने विचार करून उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सुचविले.

मुख्यमंत्री ठाकरेंनी वाढविले झाकिर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर येथे अहोरात्र सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल खचू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शनिवारी (ता.२४) त्यांच्याशी संवाद साधला. कोरोना महामारीच्या काळात तुम्ही २४ तास सेवा देत आहात, त्यामुळे तुम्ही सर्वांसाठी देव आहात. शासन म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्हीदेखील सर्वांच्या पाठीशी देवासारखे राहा, असे भावनिक आवाहन करताना दुर्घटनेमुळे मनोधैर्य खचू देऊ नका, असा धीरही त्यांनी दिला.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ४६ बळी; पाच हजार ३४ रुग्ण बरे

बुधवारी (ता. २०) महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांचा प्राण गेल्याने रुग्णालयात तणाव व भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधत धीर दिला. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना अपघात असून, त्या घटनेने मनोधैर्य खचून न देता आपण आत्तापर्यंत यशस्वीरीत्या जी जबाबदारी पार पाडत असून, तशी जबाबदारी पार पाडण्याचे कार्य पुढे सुरू ठेवावे. अधिकाऱ्यांना सूचना देताना शहरातील शासकीय, खासगी इमारतींचे फायर, स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल, एअर कुलरबाबतचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळा व वादळवारे यादृष्टीने विचार करून उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सुचविले.

हेही वाचा: डॉक्‍टरांना अपेक्षा मुबलक ऑक्सिजन, रेमडेसिव्‍हिरची

जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आयुक्त कैलास जाधव, महापालिकेचे कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाचे डॉ. नितीन रावते, डॉ. अनिता हिरे, डॉ. किरण शिंदे, विशाल बेडसे, मेट्रन संध्या सावंत, फार्मासिस्ट टिकाराम गांगुर्डे, सिस्टर नानजर, हॉस्पिटल मॅनेजर विशाल कडाळे यांच्याशी संवाद साधला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रुग्णालयातील कामकाजाविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष सिंग, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

"डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडलेली घटना अपघात आहे. या घटनेमुळे मनोधैर्य खचून न देता आपण आत्तापर्यंत यशस्वीरीत्या जी जबाबदारी पार पाडत आहात तशी जबाबदारी पार पाडण्याचे कार्य पुढे सुरू ठेवावे. "

- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

loading image
go to top