मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे | nashik latest news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरदर : कृष्णा ठाकरे कुटुंबियांनी संगोपन केलेले बिबट्याचे बछडे चिमुकलीच्या कुशित खेळताना

मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील मोरदर शिवारात मादीपासून बिछडलेले अडीच महिन्याचे बिबट्याचे बछडे सैरभैर फिरताना कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना आढळून आले. मांजरीचे पिलू समजून त्यांनी बिबट्याच बछडे घरी आणल.

कुटुंबातील चिमुकल्यांनी दुध पाजून, खाऊ घालत त्याच संगोपन व संरक्षण केल. पाच दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत कडाक्याच्या उन्हामुळे त्वचा रोग व अपेक्षित अन्न पाणी न मिळाल्याने बछड्याची प्रकृती खालावली. बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात येताच ठाकरे कुटुंबियांनी आठ दिवस संगोपन केलेले बछडे वन विभागाच्या ताब्यात सुपूर्द केले. त्यावेळी कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांना गहीवरुन आले. वनविभागाने तीन दिवस उपचार करुन हे बछडे नाशिकला रवाना केले.

काटवन परिसरातील मोरदर शिवारात जंगल आहे. या जंगलात काेल्हे, हरीण, बिबट्यांसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर आहे. खाकुर्डी येथील कृष्णा ठाकरे यांचे कुटुंबिय माेरदर शिवारात वास्तव्याला आहे. शेताजवळ या कुटुंबातील मुलांना मांजरीच्या पिलासारखे गोंडस वेगळ्या रंगाचे बछडे दिसले. त्यांनी या बछड्याला घरी आणले. एकत्रित १८ ते २० जणांचे कुटुंब असल्याने या कुटुंबातील तिर्थ, वेदांत, दक्ष, अथर्व व दोन वर्षाची तनुजा या मुलांना बछड्याचा लळा लागला. बछडे त्यांचा जीव की प्राण झाले.

चिमुकले त्याला रोज एक ते दीड लिटर दुध पाजत होते. पाच दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे कुटुंबातील मोठ्या सदस्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत पाच दिवस हे बछडे दोन वर्षीय तनुजाजवळच झोपत होते. मादी बछड्याच्या शोधात येईल या हेतूने संबंधितांनी तीन दिवस बछडे घराबाहेर आवारात ठेवले. मादी बिबट्याच्या शोधात आलीच नाही. ठाकरे कुटुंबियांनी वन विभागाला या बाबत माहिती कळवली. वन परिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे व सहकाऱ्यांनी बछड्याला मालेगावी आणले. बछड्यालाही लळा लागल्याने ते ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांपासून दूर जाण्यास धजावत नव्हते.

हेही वाचा: Nashik : महासभेत प्रस्ताव कमी अन्‌ वादावादीच जास्त

सोमवारी वन विभागाने या बछड्याला आणल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी त्याच्या त्वचारोगावर उपचार केले. बछडे वन विभागाकडे आल्यानंतर जेवण करत नव्हते. त्वचारोगा बरोबरच भूक न लागण्याचे औषधोपचारही या बछड्यावर करण्यात आले. तीन दिवसानंतर बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वनविभागाकडे सोपविले. नाशिक येथे काही दिवस संगोपन करुन या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. बछडे दुरावल्याने मात्र ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांना करमेनासे झाले आहे.

हेही वाचा: भक्ष्य न मिळाल्याने जेव्हा कोब्राने गिळला दुसरा कोब्रा; हिंगणवाडीतला थरार

Web Title: Children Understood The Kitten And Brought Home A Leopard Calf In Malegaon Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashikLeopard
go to top