
Chitra Wagh | जबरदस्तीने धर्मांतराचा प्रकार सरकार खपवून घेणार नाही : चित्रा वाघ
नाशिक : आठवडाभरापूर्वीच सिन्नरमध्ये एका विवाहितेचे जबरदस्तीने धर्मांतर करून महिनाभर तिघांनी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत.
राज्य सरकार अशा रॅकेटविरोधात कठोर कारवाई करेल असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
दरम्यान,चांदवड तालुक्यातील विधवा महिलेची धिंड काढण्यात आल्याच्या घटनेबाबत मात्र त्यांना पक्षाच्या यंत्रणेमार्फत त्यांना माहिती दिलेली नसल्याचे समोर आले, तेव्हा त्यांनी याबाबत माहिती घेत असून कारवाईची मागणी करणार आहे असे सांगितले. (Chitra Wagh statement regarding Government will not tolerate forced conversion nashik news)
शासकीय विश्रामगृहावर चित्रा वाघ या सिन्नर येथील पीडित महिला व तिच्या कुटुंबीयांसह उपस्थित होत या घटनेबाबत पत्रपरिषदेत माहिती दिली. श्रीमती वाघ म्हणाल्या, मूळच्या संगमनेर येथील असलेल्या या पिडितेला डांबून ठेवत जबरदस्तीने तिचे धर्मांतर करण्यात आले.
फादरसह तिघांनी महिनाभर तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली परंतु, अशाप्रकारची घटना राज्यात अन्यत्रही घडत असतील. त्याविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
आश्रमशाळा, अनाथालयांमध्ये मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याचे समोर येते आहे. या साऱ्यांचा सखोल तपास व्हायला पाहिजे. तशी मागणी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अशा समाज विघातक विकृतींना थारा नाही.
कोणताही धर्म जबरदस्तीने धर्मांतराची शिकवण देत नाही. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी सरकारही कठोरपणे पावले उचलणार असल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या. चांदवड तालुक्यात विधवेची गावातून धिंड काढण्यात आल्याच्या घटनेबाबत माहिती घेत असून दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाईबाबत पोलिस अधीक्षकांशी बोलणार असल्याचे त्या म्हणाल्या.