देशातील अत्याधुनिक नवशहर सिडको उभारणार पांजरपोळ जागेत

cidco build new city
cidco build new cityesakal

नाशिक : श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ ट्रस्टच्या बाराशे ते तेराशे एकर जागेत सिडको देशातील सर्वांत अत्याधुनिक नवशहराची उभारणी करणार आहे. या प्रकल्पासाठी मंगळवारी (ता. १५) मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना सिडकोचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली. (CIDCO-build-new-city-in-Panjarpol-nashik-marathi-news)

जिल्हाधिकारी आणि सिडकोने समन्वयाने कार्यवाही करावी - भुजबळ

जिल्ह्याच्या विकासासाठी रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट करून भुजबळ म्हणाले, की सद्यःस्थितीत नाशिकच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून नवशहर निर्मितीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी आणि सिडकोने समन्वयाने कार्यवाही करावी. पांजरपोळला दिलेली जमीन नाशिक शहरात आहे. सरकारकडून ही जमीन काही अटी आणि शर्थींच्या आधारे देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि सिडकोने कायदेशीर बाबींची पूर्तता करून कामाला गती देण्यास प्राधान्य देण्यात यावे.

व्यावसायिकांच्या पुनर्वसनासंबंधी चर्चा

मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक झाली. या वेळी भुजबळ बोलत होते. बैठकीत येवला शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता, येवला शहरातील नगर परिषदेतील व्यावसायिकांच्या पुनर्वसनासंबंधी चर्चा करण्यात आली. नगरविकासचे प्रधान सचिव महेश पाठक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, येवला पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर आणि इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. मुखर्जी यांनी सिडकोची भूमिका स्पष्ट केली. मांढरे यांनी कामाबाबत पांजरपोळ ट्रस्ट आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने निर्णय घेतले जातील, असे सांगितले.

येवल्यासाठीच्या योजनांबद्दल निर्णय

येवला शहरातील भूमिगत गटार योजनेचा ६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास नगरविकासने मान्यता द्यावी. येवला नगर परिषदेमधील व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत नगरविकासने तातडीने कार्यवाही करावी. तसेच येवला नगर परिषदेंतर्गत दीडशे गाळे उपलब्ध झाले आहेत. लातूर पॅटर्नप्रमाणे व्यावसायिकांना ते उपलब्ध करून द्यावेत, असे श्री. भुजबळ यांनी सुचविले. शिंदे यांनी येवल्याच्या कामांबाबत नगरविकास विभागाला तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली.

cidco build new city
माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

दान स्वरूपात जमीन

श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ ट्रस्टला जनावरांच्या संगोपनासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दान स्वरूपात जमिनी प्राप्त झाल्या आहेत. सरकारकडून काही अटी-शर्थींवर कमाल जमीन कायदा धारणेपेक्षा अधिक जमीन देण्यात आली आहे. सरकारच्या परवानगीशिवाय अहस्तांतरणीय आहे. ट्रस्टची चुंचाळे, मखमलाबाद, म्हसरूळलगतच्या सारूळ, बेळगाव ढगा, विल्होळीमध्ये बाराशे ते तेराशे एकर जमीन आहे. या जमिनीवर पाच ते सात फूट उंचीची वृक्षलागवड करण्यात आली आहे. ही जमीन नवशहर निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. समाजातील सर्वच घटकांसाठी घरांची निर्मिती करणे, पायाभूत सुविधा पुरविणे, शाळा, दवाखाने, उद्याने, क्रीडांगण आदींची निर्मिती करून सिडको नवशहराची उभारणी करणार आहे. सिडकोने नवी मुंबई, नवीन औरंगाबाद, नाशिकमधील सिडको, नवीन नांदेड, वाळूज महानगर आदी शहरांची निर्मिती केलेली आहे. सद्यःस्थितीत नाशिकच्या वाढत्या शहरीकरणाला अनुसरून २५ वर्षांसाठी शहराचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रस्टच्या जागेवर सिडकोचा नवशहर उभारणीचा प्रस्ताव आहे.

नवशहरामधील सुविधा जागतिक स्तरावरच्या

नाशिकमधील नवशहरातील सर्व सेवा-सुविधा जागतिक स्तरावरच्या असतील. त्यात सर्व घटकांसाठी गृहनिर्माण योजना, विकसित भूखंड योजना, आयटी पार्क, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ‘रामायण’वर आधारित ‘थीमपार्क’ आदींचा समावेश असेल. सिडकोतर्फे प्रस्तावित नवशहरासाठीच्या या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत.

cidco build new city
सुरगाण्यातून गुजरातमध्ये पोचविल्या जायच्या नकली नोटा

पांजरपोळला इस्त्राईलच्या धर्तीवर सेवा-सुविधा

० सिडकोतर्फे राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी खासगी मालकीची जमीन वाटाघाटींद्वारे संपादन करण्याची कार्यप्रणाली आहे. त्यात भूधारकास २२.५ टक्के विकसित भूखंड देऊन नवशहराचा विकास प्रकल्प राबविण्यास सरकारची मान्यता.

० पांजरपोळ ट्रस्टतर्फे सरकारच्या दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याने संबंधितांना काळजीवाहक स्वरूपात सरकारच्या परवानगीने प्राप्त झालेल्या जमिनी नवशहर प्रकल्पासाठी सिडकोला हस्तांतरित करण्यात याव्यात.

० सरकारच्या निर्णयानुसार २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यास पांजरपोळ ट्रस्ट पूर्णतः पात्र नसल्याने सरकारने संपूर्ण जमीन सिडकोला नवशहरासाठी उपलब्ध करून द्यावी.

० सिडको आवश्‍यकतेनुसार अथवा सरकारने निर्देश दिल्यास इस्त्राईलच्या धर्तीवर अत्याधुनिक सेवा-सुविधांयुक्त गोशाळा, दुग्धोत्पादन केंद्र, जनावरांसाठी अत्याधुनिक दवाखाना आणि निवासासाठी भूखंड देण्यास तयार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com