esakal | गोदेच्या पुरात स्मार्टसिटीची कामे टिकणार का? नागरिकांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Smart City

गोदेच्या पुरात स्मार्टसिटीची कामे टिकणार का? नागरिकांचा सवाल

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (जि. नाशिक) : सध्या गोदाघाटावर गाडगे महाराज पुलाजवळील मरिमाता मंदिर ते टाळकुटेश्‍वर पुलादरम्यान स्मार्टसिटीअंतर्गत सुशोभीकरणाची कामे जोरात सुरू आहेत. याशिवाय जुन्या भाजी बाजाराच्या जागेवर फरशा टाकण्याचे कामही सुरू आहे. परंतु लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या कराच्या पैशातून करण्यात आलेली ही कामे गोदेच्या पुरात टिकणार का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. citizens are asking whether the works of Smart City will survive the flood of Godavari river


गत दोन वर्षांपासून स्मार्टसिटीअंतर्गत शहराच्या विविध भागात विकासकामे सुरू आहेत. लाखो रुपये खर्च करून करण्यात येत असलेली ही कामे गोदावरीच्या पूररेषेत असल्याने छोट्या-मोठ्या पुरातही ती वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गाडगे महाराज पुलालगतच्या मरिमाता मंदिरापासून टाळकुटेश्‍वर पुलापर्यंत ही कामे डोळ्यांना सुखद वाटत असली तरी गोदेच्या छोट्या पुरातही ती वाहून जाण्याची अधिक शक्यता आहे.


नदीपात्रालगत मोठी कामे

साईबाबा मंदिरासमोरील जुन्या भाजी बाजाराच्या जागेवर स्मार्टसिटीअंतर्गत लाखो रुपये खर्चून फरशा बसविण्याचे काम जोरात सुरू असून, ते येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. मात्र, गोदावरीच्या पुरात काँक्रिटीकरण केलेले मोठमोठे सिमेंटचे रस्ते वाहून जात असताना या फरशा कशा टिकणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. प्रशासनाला खरोखर शहर स्मार्ट करायचे तर ही कामे योग्य ठिकाणी व्हावीत, अन्यथा जनतेच्या कराच्या पैशातून पाण्याबरोबर वाहून जाणारी विकासकामे कोणाच्या हितासाठी, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: नाशिक : कारवर झाड कोसळून तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू!

निधी परत न जाण्यासाठी खटाटोप

स्मार्टसिटीसाठी केंद्र व राज्य सरकार भरीव निधी देतो. शहरातील याकामासाठी स्मार्टसिटीच्या स्थानिक प्रशासनाला शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, मार्चअखेरीस अनेक कामे अपूर्ण असल्याने तो निधी परत शासनाकडे जाण्याची शक्यता होती. मात्र तो परत जाऊ नये म्हणून जनतेच्या गरजेची नसलेल्या कामांचा सपाटा सुरू आहे. वास्तविक गोदेच्या छोट्या-मोठ्या पुरातही गंगाघाटावरील कामे वाहून जाण्याची शक्यता असताना दीर्घकाळ न टिकणारी ही कामे नक्की कोणाच्या हितासाठी सुरू आहेत, असा प्रश्‍न गोदावरीच्या काँक्रिटीकरणाविरोधात लढा उभारणारे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांनी केला आहे.

हेही वाचा: वाडीवऱ्हे जवळ भीषण अपघातात नाशिकचे तीघे जागीच ठार; २ जण गंभीर

loading image