esakal | नाशिककरांसाठी चामरलेणी परिसर ठरतोय ‘विकेंड डेस्टिनेशन’
sakal

बोलून बातमी शोधा

Chamarleni, Nashik

नाशिककरांसाठी चामरलेणी परिसर ठरतोय ‘विकेंड डेस्टिनेशन’

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आलेतरी खऱ्या अर्थाने पाऊस झालेलाच नाही. त्यातच कोरोना धास्तीने पोलिस यंत्रणेने त्र्यंबकेश्‍वर, पहिणे बारी आदी भागात जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे नाशिककरांनी जैन धर्मीयांची प्राचीन लेणी असलेल्या चामरलेणी डोंगराचा परिसर विकेंड डेस्टिनेशन ठरविल्याने याठिकाणी सुटीच्या दिवशी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तरुणांसह ज्येष्ठांची मोठी गर्दी उसळत आहे. (citizens are flocking to the Chamarleni area to enjoy the rainy season tourism)

शहरापासून अवघ्या सात आठ किलोमीटर अंतरावर महापालिका हद्दीतील म्हसरूळ गाव आहे. कधीकाळी मळेवस्ती असलेल्या याभागात मोजकीच नागरी वस्ती होती. कालांतराने शहराच्या इतर भागांबरोबरच या भागाचाही मोठा विकास झाला अन्‌ रो-हाऊसेस, टुमदार बंगल्यांसह मोठमोठ्या अपार्टंमेंट उभ्या राहिल्या. गावाजवळच चामरलेणी डोंगर आहे. डोंगराच्या मध्यावर, तसेच पायथ्याशी जैन धर्मीयांची लेणी आहेत. कधीकाळी केवळ ही लेणी पाहण्यासाठी मोजकेच भाविक जात असतं. आता अन्य धर्मीयही या लेणीला आवर्जून भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.

निम्मा भागात वृक्षराजी

डोंगराच्या पायथ्याच्या निम्म्यापेक्षा अधिक भागात वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. पावसाळ्यामुळे हा भाग अधिक हिरवागार झाला आहे. पर्यटकांना त्याचीच मोठी मोहिनी पडली आहे. पायथ्याशी शहराकडील, तसेच दिंडोरी रस्त्याकडील भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष असल्याने हा भाग हिरवागार झाला आहे. परंतु, पेठ रोडच्या बाजूने अद्यापही झाडे नाहीत. त्यामुळे वृक्षप्रेमींना दूरवर न जाता शहरालगत या भागात वृक्ष लागवडीसाठी अद्यापही वाव आहे. शोभेच्या झाडांऐवजी वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा अशी देशी झाडे लावल्यास परिसराच्या सौंदर्यात अधिक भर पडून पक्षांचीही संख्या वाढू शकते.

एअर फोर्सचा आक्षेप

चामरलेणीच्या पायथ्याशी एअर फोर्स स्टेशन असल्याने देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या भागाला मोठे महत्त्व आहे. या भागाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, म्हणून मध्यंतरी वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी तीर्थक्षेत्रातील संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी पत्र दिले आहे. या भागात चारपेक्षा अधिक मजली इमारतींच्या बांधकामांना परवानगी नाही. त्यातच शनिवार, रविवार सोडाच इतर दिवशीही याभागात मोठी गर्दी उसळत असून, ती या महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याचे अधिकाऱ्यांनी संबंधितांना सांगितले. या अधिकाऱ्यांनी या ठिकाणची गर्दी थांबविण्याची विनंती दिगंबर जैन सिद्धक्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनाही केली आहे. परंतु, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.

हेही वाचा: SSC Result 2021 : नाशिक विभागाचा निकाल 99.96 टक्‍के

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न

इतर पर्यटन क्षेत्रासारखेच याठिकाणीही काही मद्यपी डोंगरावर मद्यपानासाठी येतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळतात. याशिवाय तरुण- तरुणीही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात, त्यामुळे अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. याशिवाय अनेक हौशी थेट डोंगराच्या टोकावर जातात. यात तरुणाबरोबरच तरुणींचाही मोठा भरणा असतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने याठिकाणी जाणे धोक्याचे असल्याचा इशारा संबंधित यंत्रणेने दिला आहे, पण त्याकडे साफ दुर्लक्ष करत अनेकजण टोकावर जात असल्याने पोलिसांवरील जबाबदारीही वाढली आहे.

मोठे धार्मिक महत्त्व

म्हसरूळ गावातील दिगंबर जैन सिद्धक्षेत्र अर्थात गजपंथास जैन धर्मियांत मोठे व आदराचे स्थान आहे. हजारो वर्षांपूर्वी याठिकाणी जैन धर्मातील गजकुमार स्वामी मोक्षास गेले. याशिवाय म्हसरूळ भागातून पाहिले असता चामरलेणी डोंगर एखाद्या बसलेल्या हत्तीसारखा भासतो, म्हणून याला गजपंथ असे नाव पडल्याचे समाजातील जुनेजाणते सांगतात. जैन धर्मियांत पवित्र मानले गेलेल्या नऊ बलभद्रांना पूजनीय स्थान आहे. त्यापैकी तब्बल सातजण याठिकाणाहून मोक्षास गेले म्हणून या सिद्धक्षेत्रास मोठे धार्मिक महत्त्व आहे. चामरलेणीपर्यंत जाण्यासाठी जवळपास तीनशे चाळीस दगडी पाय-या आहेत. लेणींमध्ये जवळपास अठरा कोरीव मूर्तींसह अन्य मूर्तीही आहेत. येथील टाक्यात असलेले थंड पाणी लेणी पाहण्यासाठी आलेल्यांची तहान भागवितात.

(citizens are flocking to the Chamarleni area to enjoy the rainy season tourism)

हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण : तरणतलावात आढळले कोकेन

loading image