esakal | लसीच्या शोधात येवलेकरांची ग्रामीण भागातील केंद्रावर धाव!

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

लसीच्या शोधात येवलेकरांची ग्रामीण भागातील केंद्रावर धाव!

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असताना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. विशेष म्हणजे शहरात एकाच ठिकाणी लसीकरण (Corona vaccination) होत असल्याने अनेक नागरिक ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करत आहेत. ग्रामीण भागात गावोगावी लसीकरणाचे कॅम्प (Vaccination Camp) होत असून, त्या धर्तीवर शहरातही ‘वॉर्ड तेथे लसीकरण कॅम्प’ घेण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. (Citizens from Yeola are going to the rural vaccination center to get the vaccine)

पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना लसीकरणाच्या रांगेत उभे राहून माघारी फिरण्याची वेळ येत आहे. आतापर्यंत तालुक्यात फक्त २० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, हजारो लोक प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सहा ठिकाणी लसीकरण होत असताना शहरात मात्र फक्त एकट्या उपजिल्हा रुग्णालयातच लसीकरण होत आहे. त्यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत येथे अल्प प्रमाणात लस उपलब्ध होत असल्याने शहरवासीयांचा हिरमोड होत आहे. यामुळे अनेकांनी तर भारम, नगरसूल, सावरगाव, अंदरसूल, पाटोदा येथे जाऊन लस मिळविली आहे. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने गावोगावी लसीकरणाचे शिबिर घेतले जात आहे. आतापर्यंत अंदरसूलसह बोकटे, सायगाव, नागडे, उंदीरवाडी, कोटमगाव देवीचे, मुखेड, जळगाव नेऊर, चिचोंडी, देशमाने, पाटोदा, सावरगाव, कुसूर, कुसमाडी, राजापूर, नगरसूल, ममदापूर, खिर्डीसाठे, भारम, भुलेगाव, अंगुलगाव, देवठाण, सुरेगाव रस्ता या ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प झाले असून, त्या माध्यमातून सुमारे १६ हजार नागरिकांना लस दिली गेली आहे.

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

याउलट शहरात मात्र लोकप्रतिनिधी व नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. यामुळे एकट्या उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण होत असून, येथे आतापर्यंत केवळ तीन हजार ९९१ नागरिकांनाच लस मिळाली आहे. किंबहुना वाढत्या गर्दीमुळे येथे दररोजच वाद होत असल्याचे प्रकारही घडत आहेत. ग्रामीण भागाच्या धर्तीवर नगरसेवकांनी पुढाकार घेऊन शहरात ‘वॉर्ड तेथे लसीकरण कॅम्प’ मोहीम राबविण्याची मागणी केली जात आहे.

शनिवारपासून तालुक्यात लस संपली असल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. आजही कुठेच लस दिली गेली नाही, तर पंचायत समितीकडे गावोगावी लसीकरण कॅम्प घेण्याचे पत्र येत आहे. त्यामुळे लस उपलब्ध होताच टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गावांत लसीकरण शिबिर घेतले जाईल.

-प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

आतापर्यंत झालेले लसीकरण...

आरोग्य केंद्र - दिलेली लस

अंदरसूल - ३,४२६

मुखेड - ३,०६४

पाटोदा - ३,४७७

सावरगाव - ४,१७८

भारम - २,०५१

येवला - ३,९९१

एकूण ः २०,१८७

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला