esakal | कोरोना लसीसाठी नाशिककरांची पहाटे तीनपासूनच गर्दी; तब्बल तीनदा चकरा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

कोरोना लसीसाठी नाशिककरांची पहाटे तीनपासूनच गर्दी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी महापालिकेने टोकन पद्धतीने लस वितरणाची पद्धत सुरू केली खरी, पण यात सकाळी सहालाच लस संपत असल्याने लोकांची पहाटे तीनपासूनच गर्दी उसळते. टोकन मिळण्यापूर्वी नंबर लावायला एवढी गर्दी असते, की सगळ्या केंद्रांवर भल्या पहाटे सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडतो. गर्दीवर नियंत्रणासाठी महापालिका कर्मचारी नसतात व पोलिसही नसतात. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असलेल्या या काळातच शहरातील लसीकरण केंद्रावर सामाजिक अंतर नियमांचा फज्जा उडतो.(citizens have been rushing for vaccinations since three in the morning in Nashik)

टोकन वितरण सकाळी सातपासून

महापालिकेने अठरा वर्षांच्या तरुणांचा अपवाद वगळता ज्येष्ठांसाठी ऑनलाइन नोंदणी बंद केली आहे. नोंदणीसाठी लॉगिन झाल्यानंतर शहरातील केंद्रांवरील स्लॉट बुक असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठाला लसीकरण केंद्रावर जाण्याशिवाय पर्यायच नसतो. साहजिकच मध्यरात्री एकपासून लसीकरण केंद्रावर गर्दी होते. ही गर्दी वाढत जाऊन पहाटे तीनपासून प्रचंड वाढते. नेमक्या त्याच वेळेला केंद्रावर नावनोंदणी सुरू होते. नाव नोंदविताना लागलीच टोकन दिले जात नाही. टोकन वितरण सकाळी सातपासून सुरू होते. तासभर नाव नोंदवून घेतले जातात. जेवढ्या लस येणार तेवढ्यांची नावे घेऊन बाकीच्यांना घरी जाण्यास सांगितले जाते. पुन्हा दुसऱ्या दिवशी घरी जावे लागलेले नागरिक आणखी लवकर येऊन गर्दी करतात. पहाटे नाव नोंदवून घ्यायचे, सकाळी सातपासून टोकन वाटायचे आणि पुन्हा सकाळी साडेनऊला प्रत्यक्ष लसीकरण सुरू करायचे म्हणजे एकेका व्यक्तीला लसीकरणासाठी तब्बल तीनदा चकरा माराव्या लागतात.

हेही वाचा: नाशिककरांसाठी चामरलेणी परिसर ठरतोय ‘विकेंड डेस्टिनेशन’


घरी पाठविता कशाला?

एकेका केंद्रावर तीनशे ते चारशे नागरिकांची गर्दी होते. प्रत्यक्षात लसीचे डोस येतात ३०, ६० या प्रमाणात. त्यामुळे रोज ७५ टक्के नागरिकांना विनालस रांगेत थांबून माघारी जावे लागते. जर त्याचवेळी दुसऱ्या दिवसाची नावनोंदणी करून घेत दुसऱ्या दिवशीचे टोकन दिले तरी संबंधिताचा दुसऱ्या दिवसाचा फेरा वाचू शकतो. दोन चकरा मारल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण सकाळी साडेनऊला सुरू होते. तेव्हा प्रत्यक्ष लस घेण्यासाठी पुन्हा तिसरा चक्कर मारावा लागतो. जेव्हा मध्यरात्री लोक येतात तेव्हाच टोकन वितरित करण्यात अडचण काय, हा सामान्यांचा प्रश्न आहे.


ज्येष्ठांचे प्रमाण अधिक

एकदा मध्यरात्री दोन-अडीचपासून दुसऱ्यांदा सकाळी सातला आणि त्यानंतर लस घ्यायला साडेनऊला, अशा तीन चकरांमुळे वैतागणाऱ्यांत ज्येष्ठांचे प्रमाण अधिक असते. अनेकजण लस नको म्हणत घरीच थांबतात. नंबर लागूनही वारंवार चकरा मारायची मानसिकता नसलेले लोक येतही नाही. मनस्तापामुळे नंबर लावूनही लसीकरणाला न येणाऱ्यांच्या जागी सोयीचे लोक घुसविले जातात. ही लस वाया तरी जाते. त्यामुळे डोसची नासाडीही सुरू आहे.

(citizens have been rushing for vaccinations since three in the morning in Nashik)

हेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव

loading image