Latest Marathi News | 100हून अधिक दिवस पडल्याने कुजले मृतदेह; पालकमंत्र्यांच्या भेटीत घटना उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MP Hemant Godse, Police Commissioner Jayant Naiknaware and Medical Officer during a meeting called by Guardian Minister Dada Bhuse on Thursday regarding the rotting bodies.

Nashik News : 100हून अधिक दिवस पडल्याने कुजले मृतदेह; पालकमंत्र्यांच्या भेटीत घटना उघड

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील शवागारात शंभर दिवसांहून अधिक दिवस मृतदेह पडून राहिल्याने ते कुजल्याची बाब पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (ता. २४) भेट दिल्यानंतर उघड झाली. (civil hospital Decomposing bodies after lying more than 100 days incident revealed during visit of dada bhuse nashik Latest Marathi News)

‘सकाळ’ व ‘साम’ने ‘जिल्हा रुग्णालयात शवगारातील मृतदेह कुजले’ वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताने आरोग्य यंत्रणेच्या काराभाराविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालय गाठत वृत्ताची माहिती घेतली. यात जिल्हा रुग्णालयातील शवागारात शंभर दिवसांहून अधिक दिवस मृतदेह पडून राहिल्याने ते कुजल्याचे उघड झाले. श्री भुसे यांनी पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची बैठक घेतली. यात माहिती घेताना कामकाजासंदर्भातील त्रुटींवरून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांना फटकारले.

तातडीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार होण्यासाठी पोलिस आणि आरोग्य विभागाने समन्वय ठेवून काम करावे, असे सूचित करीत जिल्हा रुग्णालयातील शवागार आणि मृतदेहांवर लवकरात लवकर अंत्यसंस्कार व्हावेत, असे सांगितले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी तातडीने नवी यंत्रणा उभारण्यासंदर्भात पावले उचलले जातील. ५० लाख रुपये खर्चून ६० मृतदेह ठेवता येतील, अशी यंत्रणा उभारण्यात येईल, असे या वेळी सांगितले. दरम्यान, यंत्रणा दुरुस्त करण्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Labor Election : मजूर फेडरेशनसाठी तिरंगी, बहुरंगी लढती; 7 तालुका प्रतिनिधी बिनविरोध

तीन वर्षांपासून प्रस्ताव धूळखात

पालकमंत्री यांनी भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की जिल्हा रुग्णालयात सध्या फक्त चार मृतदेह ठेवता येतात. दहा ते बारा मृतदेह कायम येथे असतात. मात्र मृतदेह चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी शीतपेटीसदृश व्यवस्थेची गरज आहे. जी सध्या नाही. तसेच यासंदर्भात तीन वर्षांपासून प्रस्ताव पडून आहेत.

पोलिस आणि आरोग्य विभागाशी संबंधित काही प्रश्न आहेत. मृतदेह किती दिवस ठेवायचे तसेच जिल्हाबाहेरील मृतदेहांचे संकलन असे काही विषय आहेत. त्याबाबत दोन्ही यंत्रणांनी बैठक घेऊन मुद्दे निकाली काढायचे आहेत. प्रस्ताव मान्यतेसाठी पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला जाईल, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा: Nashik News : फर्निचर घोटाळयाचा अहवाल दडपला?; समितीने दिला होता 62 कोटींच्या तफावतीचा अहवाल

शवविच्छेदन कक्षात गुरुवारी भेट देत माहिती घेताना पालकमंत्री दादा भुसे.

शवविच्छेदन कक्षात गुरुवारी भेट देत माहिती घेताना पालकमंत्री दादा भुसे.

आठ तास वीज देण्यासंदर्भात सूचना

शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळावी, अशा राज्य शासनाच्या सूचना आहेत. भारनियमन करताना गावांचे नियोजन चक्राकार पद्धतीने झाले पाहिजे. हा नियम आहे. एका आठवड्यात काही गावांना तीन, तर काही गावांना तास याप्रमाणे तर दुसऱ्या आठवड्यात हा विषय चक्राकार करून गावांचे तास बदलायचे असतात. मात्र नाशिक जिल्ह्यात काही गावे अशी आहेत की, ज्यांना वर्षानुवर्षे रात्री वीजच मिळत नाही.

एकाच पद्धतीचे भारनियमन लादले जाते. त्यात सुधारणा व्हावी. शेतकऱ्यांना किमान आठ तास वीज मिळावी. गोवर आजारावर लक्ष ठेवताना लसीकरणावर लक्ष दिले जावे. संशयितांचे नमुने घेण्यासह आपत्कालीन स्थितीत गोवरच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दुर्गंधी किती; काळजी घ्या

पालकमंत्री दादा भुसे यांनी सकाळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासमवेत जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षास भेट दिली. या ठिकाणी येणाऱ्या दुर्गंधीने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काळजी घ्या, असा सल्लाही दिला. दरम्यान, श्री. भुसे संतप्त झाल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना शवागर दाखवलेच नाही. आज या ठिकाणी मृतदेहांना आच्छादनात बांधण्यात आले होते.

हेही वाचा: Nashik Crime News : मोठ्या भावाच्या शिवीगाळीचा लहानगा बळी; आधारतीर्थ आश्रमातील खुनाची अखेर उकल