esakal | नाशिकची दक्षिणेतील कांद्याशी स्पर्धा! सिंगापूर-मलेशियामध्ये बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

onion

नाशिकच्या कांद्याची स्पर्धा! सिंगापूर-मलेशियामध्ये बोलबाला

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तानमधील (Baluchistan) कांदा (onion) जुना झाला असताना भाव टनाला ४०० डॉलरपर्यंत असल्याने सद्यःस्थितीत सिंगापूर (singapur) आणि मलेशियात (Malaysia) भारतातील साठवलेल्या उन्हाळ कांद्याचा (indian summer onion) बोलबाला आहे. उन्हाळ कांद्याचा सिंगापूर आणि मलेशियामध्ये टनाचा भाव ३६० ते ३७५ डॉलरपर्यंत आहे. पण, त्याचवेळी युरोपसह श्रीलंका बाजारपेठ बंद झाली असली, तरीही अफगाणमधील (Afghanistan) अस्थिरतेमुळे तेथून दिल्लीच्या बाजारात येणारा कांदा थांबल्यात जमा आहे.

पाकचा कांदा जुना झाल्याने ‘उन्हाळ’चा सिंगापूरसह मलेशियामध्ये बोलबाला

नाशिकच्या साठवलेल्या उन्हाळ कांद्याची आंध्र प्रदेश-तेलंगणा, कर्नाटक या दक्षिण भारतातील कांद्याची स्पर्धा ठरलेली असते. दोन वर्षांत पावसाने दक्षिणेतील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळाला. कांद्याची निर्यात बंद केल्याने देशांतर्गत विक्रीसाठी नाशिकच्या कांद्याला ‘लॉटरी’ लागली होती. मात्र, ही परिस्थिती यंदा ‘रिपीट’ होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. दक्षिणेतील नवीन कांदा बाजारात येऊ लागला असला, तरीही त्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न असल्याने व्यापाऱ्यांचा सध्या नाशिकच्या कांद्याकडे ओढा आहे. मात्र यंदा पंधरा दिवसांनंतर दक्षिणेतील कांद्याची आवक वाढल्यानंतर भाव कसे राहणार, याबद्दल प्रश्‍नचिन्ह आहे. व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिणेतील किलोभर कांद्याचा भाव २२ रुपयांपर्यंत जातो, तर नाशिकच्या कांद्याचा भाव १७ रुपये किलोपर्यंत पोचतो. शनिवारी (ता. ४) पर्युषण पर्वारंभ, नंतर रविवार (ता. ५), सोमवारी (ता. ६) पोळा असे तीन दिवस बाजार बंद राहणार असल्याने शुक्रवारी (ता. ३) दुपारनंतर कांद्याच्या भावात किलोला ५० ते ७५ पैशांची वाढ झाली. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ हंगामात एक लाख ७१ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. त्यापासून ४५ लाख टनांहून अधिक उत्पादन मिळाले असून, त्यातील पन्नास टक्क्यांपर्यंत कांदा चाळींमध्ये आहे. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे कोंब फुटणे, वजन घटणे, वास येणे यातून दहा ते पंधरा टक्के कांद्याचे नुकसान होणार, असे गृहीत धरले, तरीही १८ लाख टनांहून अधिक शिल्लक कांद्याच्या भावावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असेल.

हेही वाचा: नाशिक : कांद्यांची आवक घटूनही बाजार भाव घसरलेलेचकमी दिवसांची वाहतूक
सिंगापूर, मलेशियामध्ये भारतीय कांदा पोचण्यासाठी नऊ दिवस, तर पाकिस्तानच्या कांद्यासाठी १३ दिवस लागतात. त्यामुळे सिंगापूर आणि मलेशियातील आयातदारांची भारतीय कांद्याला पसंती मिळत आहे. श्रीलंकेत नवीन कांद्याची आवक सुरू झाली असताना यापूर्वीच्या तेथील सरकारच्या धोरणाच्या अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या काही दिवसांत आयात शुल्काचा भुर्दंड भारतीय कांद्याला सोसावा लागेल. त्यामुळे श्रीलंकेतील निर्यातीकडे व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतला आहे. सिंगापूरमध्ये इजिप्तचा कांदा पोचण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागतो. म्हणूनच टनाला २८० डॉलर इतका कमी भाव असूनही सिंगापूरमध्ये इजिप्तला कांद्याला मागणी नाही. युरोपच्या बाजारपेठेत हॉलंडचा कांदा टनाला ४०० डॉलर या भावाने विकला जात आहे. चीनमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली असून, त्याचा भाव टनाला ४५० डॉलरच्या आसपास आहे. पुढील महिन्यात चीनमधील कांद्याची आवक वाढत असताना पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील नवीन कांद्याची आवक सुरू होणार आहे. भारतीय कांद्याचा मनिलासाठी ४५०, ऑस्ट्रेलियासाठी ४१०, जपानसाठी ५५० डॉलर असा टनाचा भाव आहे.


आठवड्याला २० हजार टन देशांतर्गत
नाशिकमधून व्यापारी आठवड्याला २० हजार टन कांदा उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाममध्ये रेल्वेद्वारे विक्रीसाठी पाठवत आहेत. यंदा मात्र खरेदी करून प्रत्यक्ष विक्रीपर्यंत तीन ते पाच टक्के कांद्याचे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांना आढळून येत आहे. याशिवाय डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतुकीचा क्विंटलचा खर्च सव्वाशे रुपयांवरून १४० रुपयांपर्यंत पोचला आहे. बारदाणाची किंमत ५० रुपयांवरून ७० रुपये झाली आहे. मजुरीसाठी दिवसाला अडीचशे रुपयांऐवजी तीनशे रुपये द्यावे लागत आहेत.

हेही वाचा: कैद्यांनी बनविलेल्या गणपती मूर्ती विक्री केंद्राचे उद्घाटन
कांद्याच्या भावाची स्थिती (आकडे प्रतिक्विंटल सरासरी रुपयांमध्ये)
* बेंगळुरू- स्थानिक एक हजार- महाराष्ट्रातील एक हजार १००
* लखनौ- दोन हजार
* अजमेर- एक हजार ९००
* मुंबई- एक हजार ३००
* पुणे- एक हजार १००
* येवला- एक हजार ३५०
* नाशिक- एक हजार २००
* लासलगाव- एक हजार ५५१
* कळवण- एक हजार ४५१
* मनमाड- एक हजार ३५०
* सटाणा- एक हजार ४५०
* पिंपळगाव- एक हजार ६२१
* देवळा- एक हजार ४७५

loading image
go to top