
Nashik News : कामे वेळात पूर्ण करा, 31 मार्चपूर्वी निधी खर्च करा; ZP CEO मित्तल यांच्या सूचना
नाशिक : जिल्ह्यात विविध लेखाशिर्षकाखाली विकास कामे सुरू आहे. ही कामे वेळात पूर्ण करावीत. कोणत्याही परिस्थितीत कामे अपूर्ण राहता कामा नये. प्राप्त झालेला निधीचे नियोजन करून ३१ मार्च पूर्वी १०० टक्के निधी खर्च करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. (Complete works on time spend funds before March 31 Instructions from ZP CEO Mittal Nashik News nashik news)
जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख आणि सर्व गटविकास अधिकारी यांची समन्वय सभा शुक्रवारी (ता.१०) मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांसह सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थितीत होते.
तब्बल तीन तास झालेल्या बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा तसेच १५ व्या वित्त आयोग निधी, विकास निधी खर्चाचा आढावा मित्तल यांनी घेतला.
पंतप्रधान आवास योजना, शबरी विकास यांसह जिल्हा परिषदेचे मॉडेल स्कूल, मिशन भगीरथी प्रयास, जलजीवन मिशन, वृक्ष लागवड, संरक्षण भिंत बांधकाम आदींचा सविस्तर आढावा झाला. तालुकानिहाय निधी खर्चांचा यावेळी आढावा होऊन, कमी निधी खर्च झालेल्या तालुक्यांनी ३१ मार्चपर्यंत निधी खर्च करावा, असे आदेश मित्तल यांनी यावेळी दिले.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
१५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी नियोजन २० मार्चपर्यंत करून निधी खर्च करावा. प्रामुख्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत सुरू असलेली कामे तत्काळ सुरू करावी, अपूर्ण घरकुल वेळात पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे अशा सूचना मित्तल यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या.
निधी प्राप्त होऊनही अद्याप कामे सुरू झालेली नसल्याने कामे वेळात सुरू करून ती कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात यावी. मिशन भगीरथ प्रयास योजनेतील नरेगातंर्गत घेण्यात आलेली कामे त्वरित सुरू करावी. मॉडेल स्कूल अंतर्गत करावयाची कामांचे नियोजन करून ती सुरू करावी, अशा सूचना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांनी यावेळी दिल्या.